पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात ; तालुका शिवसेना करणार जंगी स्वागत !

हरी खोबरेकर यांची माहिती : पर्यटन विकासाचा आराखडा ना. ठाकरेंना सादर करणार

मालवण : युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उद्या (सोमवारी) सिंधुदुर्गात येणार आहेत. यावेळी तालुका शिवसेनेच्यावतीने कुंभारमाठ आणि शिवसेना कार्यालयासमोर ना. ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तालुक्यातील पर्यटन विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसंदर्भात एक आराखडा यावेळी ना. आदित्य ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, किरण वाळके, किसन मांजरेकर, दीपक देसाई, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, किशोर गावकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते. श्री. खोबरेकर म्हणाले, कोरोनानंतर पर्यटनाला उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे चांगल्याप्रकारे काम करत आहेत. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ते आणत आहेत. यात किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी नळपाणी योजनेसाठी सुमारे १ कोटी ६० लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. शहरातील मत्स्यालयासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच पर्यटन ठिकाण असलेल्या देवबाग, तारकर्ली रस्त्यासाठी सुमारे दीड कोटी रूपये तसेच इतर पर्यटन ठिकाणांच्या विकासासाठी ठाकरे सरकार प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्गातील तालुक्याच्या पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती त्यांना या दौऱ्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


किनारपट्टीवर बंधाराकम रस्ता, अल्प भूधारकांना निवासी पर्यटनासाठी प्रोत्साहन, मच्छीमार गावे आणि पारंपरिक मच्छीमार याबाबत पर्यटनातून विकास मुदतबाह्य ट्रॉलरचा वापर पर्यटनासाठी करता येईल का? ग्रामीण भागातील मंदिरांचा तिर्थक्षेत्र पर्यटन विकासातून निधी उपलब्ध करून देणे, साहसी जलक्रीडांसाठी आवश्यक परवानग्या आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, सागरी जैवविविधतेचे रक्षण करत पर्यटन विकास, सिंधुदुर्गाचा ब्रँड जगभरात नेण्यासाठी प्रयत्न करणे, हेलिकॉप्टर सफर, गोव्याच्या धर्तीवर दुचाकी रिक्षा यांना पर्यटनासाठी सवलत व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, इलेक्ट्रीक गाड्यांसाठी प्रयत्नशील, हुक फिशींगसाठी प्रोत्साहन देणे. पावसाळी पर्यटनासाठी नियोजन करणे, नद्यांमधील गाळ काढण्यात आल्याने खाडीपात्रांमध्ये जलपर्यटन अशाप्रकारे सिंधुदुर्ग आणि मालवणच्या पर्यटन विकासासाठी एक अभ्यासपूर्ण विकास आराखडा पर्यटनमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!