सिंधुदुर्गात सत्ताधाऱ्यांची “बेनामी ठेकेदारी” ; मनसेचा आरोप

निकृष्ट कामांबाबत जनतेनेच रस्त्यावर उतरावे, मनसेचा पाठिंबा : परशुराम उपरकर यांचे आवाहन

कुणाल मांजरेकर

मालवण : सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यात विकासाच्या केवळ घोषणाच केल्या जात असून विकास ठप्पच आहे. ज्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचे सांगून नारळ फोडले जातायत, त्याठिकाणी प्रत्यक्षात केवळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून जेथे डांबरीकरण सुरू आहे, ती सर्वच कामे निकृष्ट पध्दतीने सुरू असून जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांकडून बेनामी ठेकेदारी सुरू असल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण मधील पत्रकार परिषदेत केला. लोकप्रतिनिधीच टक्केवारी घेत असल्याची चर्चा जनमानसात सुरू असून सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी विविध ठिकाणी जनताच रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहे. दर्जेदार विकास कामांसाठी जनतेने असाच उठाव करावा, मनसे नेहमीच जनतेसोबत राहील, अशी असेही ते म्हणाले.

मालवण येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, तालुका उपाध्यक्ष उदय गावडे, भाई मालंडकर, शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, आबा आडकर, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेकडून मच्छीमारांची दिशाभूल

पारंपरिक आणि पर्ससीन मच्छिमारांच्या संघर्षात शिवसेनेने मागील काही वर्षात खोटे आणि दिशाभूल पद्धतीचे राजकारण सुरू केले आहे. रत्नागिरीत पर्ससीन मच्छीमारांच्या बाजूने असणारी शिवसेना सिंधुदुर्गात पारंपरिक मच्छीमारांची दिशाभूल करते. मच्छीमारांच्या बाजूने कायदे केले असे सांगून केवळ आपले सत्कार करून घेण्याचे काम स्थानिक आमदार करत आहेत. प्रत्यक्षात कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा, कर्मचारी उपलब्ध केले जात नाहीत. नव्या कायद्याची अंमलबजावणी होत नसून पर्ससीन नौका खुलेआम मासेमारी करीत आहेत. त्यामुळे मच्छीमारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोप उपरकर यांनी केला.

यावेळी श्री. उपरकर म्हणाले, गेल्या काही वर्षात सत्ताधारी लोकप्रतिनिधी विकासाच्या नावाने दिशाभूल करत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे. विकास निधीच्या कोट्यवधींच्या घोषणा करायच्या हा सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री यांचा नित्यक्रम बनला आहे. घोषणा केलेले पैसे कागदावरच दिसून येतत. प्रत्यक्षात जाहीर विकासनिधी येतच नाही. उपलब्ध निधीतून जी काही रस्ते विकासकामे केली जातात ती बेनामी ठेकेदारी पद्धतीने निकृष्ट दर्जाची सुरू असल्याची चर्चाही आता जोर धरत आहे. असाही आरोप उपरकर यांनी केला. जनतेने आपल्या गावात निकृष्ट कामे सुरू असतील तर ती रोखली पाहिजेत. कारण एका वर्षात वाहून जाणारा विकास आम्हाला नको. शाश्वत व दर्जेदार विकास ही आग्रही भूमिका जनतेने ठेवावी. जनतेला आवश्यक असणारी माहिती व संपूर्ण पाठिंबा मनसे पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल. त्यामुळे जनतेने पुढे यावे असे आवाहन उपरकर यांनी केले.

आरोग्य यंत्रणा कमकुवत ; वैद्यकीय महाविद्यालयातही सुविधांची वानवा

कोरोनाच्या काळात एवढे डॉक्टर आणले, तेवढे डॉक्टर आणले सांगून सत्ताधाऱ्यांनी फुशारक्या मारल्या. मात्र त्यावेळी जॉईन झालेले डॉक्टर आता आहेत का, ते सत्ताधारी लोकप्रतिनिधीनी पाहावे, पगार न मिळाल्याने अनेकांनी राजीनामा दिला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्याने सत्ताधारी आनंदोत्सव साजरा करीत असले तरी प्रत्यक्षात याठिकाणी अद्याप डॉक्टर, स्टाफ नाही. मेडीकल च्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सोयी सुविधांची देखील वानवा आहे, असे परशुराम उपरकर म्हणाले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!