आंगणेवाडी यात्रा तोंडावर, एसटी सेवेचा अद्यापही बोजवारा
निलेश राणेंनी वेधले लक्ष ; राज्य सरकार लक्ष देणार की कोकणला वाऱ्यावर सोडणार ?
कुणाल मांजरेकर
मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीची जत्रा येत्या २४ फेब्रुवारीला होत आहे. मात्र अद्याप एसटी संप मिटलेला नाही. त्यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता असून या प्रश्नाकडे भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. या प्रश्नी राज्य सरकार काहीतरी करणार की नेहमीप्रमाणे कोकणला वाऱ्यावर सोडणार ? असा सवाल त्यांनी केला आहे.
आंगणेवाडी येथील भराडी देवीची जत्रा म्हणजे महाराष्ट्रातील मुख्य जत्रांपैकी एक असून दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जत्रेसाठी उपस्थिती लावतात. या जत्रेत एसटी सेवा हे दळणवळणाचे मुख्य साधन असते. जत्रेच्या कालावधीत एसटी ला देखील लाखोंचा फायदा होतो. मात्र राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संपातील काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली असली तरी अद्यापही बहुतांश कर्मचारी संपावर असल्याने एसटीची चाके रुळावर आलेली नाहीत. त्यामुळे यंदा आंगणेवाडी यात्रेत भविकांची गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक येतात, तळकोकणातील हा मोठा यात्रोत्सव. मात्र मागील अनेक दिवसापासून गावी जाणाऱ्या एसटी बस सेवा अर्धवट असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यासाठी राज्य सरकार काहीतरी करणार की नेहमीप्रमाणे कोकणाला वाऱ्यावर टाकणार?” असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.