सुशांतसिंगच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांचे दोनवेळा कॉल ….
मला बोलायला लावू नका ; पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंचा ट्विटरवर बॉम्ब
मिलिंद नार्वेकर यांना टॅग करून दिलाय इशारा ; राणेंच्या नव्या ट्विटमुळे खळबळ
कुणाल मांजरेकर
भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी सायंकाळी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता ट्विटरवरूनही बॉम्ब टाकला आहे. सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा कॉल केला होता, हे आपण विसरलात की काय ? असा सवाल राणेंनी मिलिंद नार्वेकर यांना टॅग करीत उपस्थित केलाय.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याचा मागील वर्षी संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. या मृत्युनंतर राज्याच्या राजकारणातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. या हत्येनंतर राज्य सरकारच्या विरोधात भाजपाच्या नेत्यांनी विशेषतः नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या आरोपातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. कालांतराने हे प्रकरण सर्वांच्या विस्मृतीत गेले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
नारायण राणेंनी आजच्या पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांचा “बॉय” म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर राणेंना टॅग करीत “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” असा सवाल केला होता. त्याला राणेंनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
ट्विटरवर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना टॅग करून सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणाचा उल्लेख त्यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर यांना टॅग करून केलेल्या ट्विटमध्ये राणेंनी म्हटले आहे की, “सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका” असे राणेंनी म्हटले आहे.