महेश कांदळगावकर यांच्यावर शिवसैनिकच नाराज ; सुदेश आचरेकरांचा हल्लाबोल
“त्यांचा” चेहरा घेऊन पालिका निवडणूकीत उतरण्यास शिवसैनिकांचाच विरोध
भुयारी गटार योजनेत आर्थिक गोलमाल झाल्याचाही आरोप
कुणाल मांजरेकर
मालवण : नगराध्यक्ष म्हणून महेश कांदळगावकर हे गेल्या पाच वर्षात शहरातील एकही विकासकाम पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर शिवसैनिकच नाराज असून महेश कांदळगावकर यांचा चेहरा घेऊन पालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरण्यास शिवसैनिकांचा विरोध असल्याचा दावा भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केला आहे. भुयारी गटार योजना पूर्ण करण्यातही ते अपयशी ठरले असून ठेकेदाराला ४ कोटी रुपये अधिकचे देऊन त्यांनी आर्थिक गोलमाल केल्याचा आरोप श्री. आचरेकर यांनी करतानाच महेश कांदळगावकर व शिवसेनेचे दिवस भरले असून कांदळगावकर यांना येत्या निवडणुकीत मालवणची जनता घरात बसविल्याशिवाय गप्प राहणार नाही, अशी टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मालवण शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामावरून शिवसेना व भाजप मध्ये वाद रंगला असून महेश कांदळगावकर व सुदेश आचरेकर या दोन माजी नगराध्यक्षांमध्ये शाब्दिक द्वंद्व सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा कांदळगावकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी दीपक पाटकर, आबा हडकर आदी उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, जे नगराध्यक्ष दोन वर्षे नगरपरिषदेची सभा लावू शकले नाही, ज्यांना शहर वासीयांबद्दल आस्था नाही, ज्यांनी केवळ विकासकामांचे सांगाडे उभे केले, ज्यांना निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याचा विसर पडतो अशा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर शिवसैनिकच नाराज आहेत. शहर विकास आराखडा अरबी समुद्रात बुडवणार म्हणणाऱ्यांना स्वतःलाच अरबी समुद्रात बुडवावे लागले. सत्तेत आल्यावर विकास आराखड्याचा कांदळगावकर यांना विसर पडला. गोरगरीब जनतेला विकास आराखड्याच्या माध्यमातून उध्वस्त केले. मुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री, आमदार सर्व सत्ता केंद्र शिवसेनेच्या हाती असताना त्यांना लोकांना न्याय देता आला नाही, अशी टीका आचरेकर यांनी केली.
मालवण बसस्थानकावर मल्टिप्लेक्स करण्याच्या आमदारांच्या घोषणा हवेत विरून गेल्या आहेत. मच्छीमारांबरोबरही शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असून रत्नागिरीत पालकमंत्री पर्ससीनच्या बाजूने तर सिंधुदुर्गात आल्यावर श्रमिक मच्छीमारांची चेष्टा करत दिशाभूल करतात. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातील निधीचे आकडे फुगवून सांगून आम. वैभव नाईक हे मालवण वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. अद्याप हा निधी नगरपरिषदेकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे आमदार खोटं.. खोटं आणि खोटं सांगून जनतेची दिशाभूल करून आपली पोळी भाजून घेत आहेत. शहराचा विकास करण्याची धमक राणे कुटुंब व आमच्यात आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी रॉक गार्डन, बंदर जेटी सुशोभीकरण, चिवला बीच, दांडी बंधारा आदी कामांचा सपाटा लावून विकासकामे केली. भुयारी गटार योजना शहर वासीयांसाठी आणली. ती पुन्हा आम्हीच नारायण राणेंच्या माध्यमातून पूर्ण करू. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डास निर्मूलन, सांड पाणी, नागरिकांचे आरोग्य विचारात घेऊन ही योजना आणली. आम्ही आमच्या कार्यकाळात ८० टक्के काम पूर्णत्वास नेले. जेवढे काम पूर्ण केले तेवढेच देय अदा केले. परंतु नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराच्या देयकापेक्षा अधिकचे ४ कोटी त्याला बहाल केले आहेत. त्यामुळे ज्यांनी ८० टक्के काम पूर्ण केले त्यांना लोक स्वीकारणार ? की उर्वरित २० टक्के पैकी फक्त ५ टक्के काम झोल करून पूर्ण करणाऱ्यांना लोक स्वीकारणार ? शहर बकाल करणाऱ्या आणि भुयारी गटार योजनेत गोलमाल करणाऱ्या महेश कांदळगावकर व शिवसेनेला जनता स्वीकारणार का हे येणारा काळच ठरवेल, असेही आचरेकर म्हणाले.