शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्षपद काँग्रेसकडे, ही वैभव नाईकांची नामुष्की
निलेश राणेंची टीका ; आज आमचे प्रयत्न कमी पडले तरी उद्या नक्की यशस्वी होऊ
कुडाळ : कुडाळ शहर नगर पंचायत निवडणूकीत शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचा नगराध्यक्ष बसला आहे. ही शिवसेना आमदार वैभव नाईकांची नामुष्की असल्याची टीका भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. वैभव नाईकांच्या या माघारीमुळे कुडाळवर शिवसेनेचा भगवा फडकलाच नाही, शहरावर काँग्रेसचा झेंडा फडकला, त्यामुळे शिवसेनेने उड्या मारू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
कुडाळ नगर पंचायतीत शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांनी घाणेरडे राजकारण केले. काँग्रेसच्या नगरसेवकांना अत्यंत वाईट वागणूक मिळाली. त्यांच्या नातेवाईकांना कणकवलीत डांबून ठेवण्यात आले. इतके घाणेरडे राजकारण आजपर्यंत कधी झाले नाही. वैभव नाईक हे दिवसागणिक खालची पातळी गाठत चालले आहेत, अशी टीका त्यांनी केली. स्वतः काँग्रेसचा नगराध्यक्ष बसवून आमदार नाईक यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादाला तिलांजली दिली आहे.
कुडाळ नगर पंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने उमेदवार दिला होता. आम्ही प्रयत्न करून पाहिला. पण तो यशस्वी झाला नाही. तो आज यशस्वी झाला नाही, म्हणजे उद्या तो होणारच नाही, असे नाही. कुडाळ शहरात आज यशस्वी झालेले समीकरण जास्त काळ टिकणार नाही. भविष्यात बदल नक्की घडेल. भाजप हाच आजघडीला शहरातील सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेला भाजपपेक्षा एक जागा कमी मिळाली आहे. आणि नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला आहे, असे ते म्हणाले.