अखेर कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा
नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रिन करोल विजयी ; भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांचा केला पराभव
कुडाळ : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नगराध्यक्ष निवडणूकीत काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांचा ९ विरुद्ध ८ मतांनी पराभव केला आहे.
कुडाळ नगरपंचायत च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आठ जागांवर तर शिवसेनेने सात जागांवर यश मिळवले होते. तर काँग्रेसने या नगरपंचायतीच्या दोन जागांवर यश मिळविल्या नंतर काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची मागणी केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे संख्याबळ असले तरी भाजपने नगराध्यक्ष निवडणूकीत चमत्कार घडेल, असा दावा केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी ९ विरुद्ध ८ मतांनी विजय मिळवल्याने कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.