मालवण शहरातील १०३ अपंगांच्या खाती अपंग निधी जमा ; आ. निलेश राणे यांचा पाठपुरावा

सिंधुदुर्ग दिव्यांग संघटना मालवण शहर पदाधिकाऱ्यांनी आ. राणे यांची भेट घेत मानले आभार : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेमार्फत वाटप करण्यात येत असलेला ५ % अपंग निधी रखडला होता. याकडे कुडाळ मालवणचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर पालिका प्रशासनामार्फत १०३ अपंगांच्या खाती निधी जमा करण्यात आला आहे. याबद्दल अपंग संघटनेचे अध्यक्ष सत्यम पाटील आणि सचिव दत्ता कामतेकर यांनी आमदार निलेश राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.

नगरपालिकेच्या एकूण उत्पन्नातून बांधिल खर्च वजा जाता येणाऱ्या उत्पन्नाच्या ५ % अपंग निधी वाटप केला जातो. अपंगाच्या कल्याणासाठी २०१५ मध्ये शासननिर्णय करण्यात आला होता. त्यावेळी ३ % अपंग निधी वाटप केला जात होता. २०१८ मध्ये या शासन निर्णयात सुधारणा करून अपंग निधी ५% करण्यात आला होता. त्यानुसार नगरपालिकेला निधी वाटप करणे बंधनकारक आहे. अपंगत्वाच्या टक्केवारी नुसार तो निधी वितरित करण्यात येतो. आमच्या कालावधीमध्ये दरवर्षी चतुर्थी किंवा दिवाळीच्या दरम्यान या निधीचे वाटप केले जात होते. परंतु यावर्षी चतुर्थीला नाहीच तर अपंग संस्थेने लेखी निवेदन देवूनही दिवाळीलाही या निधीचे वितरण करण्यात आले नाही. निवडणुक आचारसहितेचा बागुलबुवा करुन निधी वाटप करण्यात आले नाही.  दिवाळीच्या दरम्यान आचारसंहिता लागणार याची पूर्वकल्पना असूनही याबाबत कुठलीही आगाऊ कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत अपंग बांधवाना या निधीपासून वंचित रहावे लागले. शहराच्या विकास कामात अनास्था असणाऱ्या प्रशासकाकडून अपंगाच्या बाबतीतही हेळसांड करण्यात आली.  

या अपंग निधीबाबतची माहिती प्राप्त झाल्यावर या बहुसंख्य अपंगाना घेवून निलेश राणे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देवून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी आमदार निलेशजी राणे यांनी आचारसंहिता संपताच लगेच हा निधी वितरित करण्याबाबत प्रशासनाला सूचना करुन निधी वितरित केला जाईल याबाबत आश्वासित केले होते. त्यानुसार आचारसंहिता संपताच मालवण शहरातील १०३ अपंगाना त्यांच्या खाती निधी जमा करण्यात आला आहे, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3863

Leave a Reply

error: Content is protected !!