नेमका त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला बेल्ट का लागतो, असं आम्ही विचारायचं का ?
तब्बेती वरून टीका करणाऱ्यांना आमदार नितेश राणे यांचा आक्रमक सवाल
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून स्वतः वर टीका करणाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी चांगले फैलावर घेतले आहे. एखाद्याच्या तब्येती वरून अशा प्रकारच्या टीका-टिप्पणी करणे अयोग्य असून राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, हे यातून दिसत असल्याचे ते म्हणाले.
प्रश्न विचारायचे असतील तर आम्हालाही विचारता येतात. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, जेव्हा ईडीच्या कारवाया सुरू होतात, त्याचवेळी मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात, असा प्रश्न आम्ही विचारला तर चालेल का ? लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री जातात. तेथे बेल्ट घालत नाहीत, पण अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री नेमके आजारी कसे पडतात ? मंत्र्यांची ईडी चौकशी लागते तेव्हा त्यांना १४ दिवस कोरोना कसा होतो, हे प्रश्न आणि विचारले तर चालतील का ? असे परखड सवाल नितेश राणे यांनी केले आहेत.
आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी कारागृहात जामीनाची पूर्तता केल्यानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. मला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर माझ्या तब्येतीवर अनेक जणांच्या प्रतिक्रिया येत होत्या. एखाद्याच्या तब्येतीवर असे भाष्य करणे योग्य नाही. मी कोल्हापूर मधील रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी पुढील दोन दिवस आमच्या एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणार आहे. तसेच काही उपचारांसाठी मुंबईला देखील जाणार आहे. मला पाठीच्या मणक्याचा त्रास आधीही होता, त्याबाबतचे रिपोर्ट आहेत. त्याशिवाय ब्लड प्रेशरचा त्रास होत असून शुगर ही कमी होत आहे. असे असताना याला राजकीय आजार असल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येतो. मी खोटं बोलत असेन, पण मेडिकलचे रिपोर्ट खोटं बोलतील का ? आज कोल्हापुरातून सिंधुदुर्ग रुग्णालयात आणल्यानंतर माझ्या ब्लडप्रेशरची चाचणी करण्यात आली, त्यावेळी ब्लड प्रेशर १५२ पर्यंत मिळून आला. हे रिपोर्ट खोटं बोलतात का ? असा सवाल करून कोणाच्याही तब्येतीवर अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करणे, राजकीय संस्कृतीला साजेसे आहे का याचा विचार प्रत्येकाने करावा, असे नितेश राणे म्हणाले.