…ज्या दिवशी मी बोलेन, त्यादिवशी अनेकांना “ब्लड प्रेशर”चा त्रास सुरू होईल !

कारागृहातून बाहेर येताच आ. नितेश राणेंचा विरोधकांना गर्भित “इशारा”

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी मागील आठवडाभर पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपा आमदार नितेश राणे अखेर आज दुपारी कारागृहातून बाहेर आले. संतोष परब हल्लाप्रकरणी तपासात पोलीस यंत्रणेला आजपर्यंत आपण सहकार्य केले आहे. हे सहकार्य कालही केले, आजही केले आणि उद्याही करणार असे सांगतानाच आपणाला ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू झाल्याने दोन दिवस एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेऊन मुंबईतील पुढील उपचार घेणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या आजारावर काहींनी वेगवेगळ्या टिपण्या करून राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो हे दाखवून दिले आहे. आपल्यावरील कारवाई ही न्यायालयीन बाब असल्याने तूर्तास या विषयावर मी काहीच बोलणार नाही. मात्र सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ज्या दिवशी मी बोलेन, त्या दिवशी खूप लोकांना ब्लडप्रेशरचा त्रास नक्की सुरू होईल, असा गर्भित इशारा आ. नितेश राणे यांनी विरोधकांना दिला आहे.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची जामिनावर सुटका करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर आज कोल्हापूर मधून त्यांना डिस्चार्ज देऊन रुग्णवाहिकेने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करून सावंतवाडी कारागृहात जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारच्या सुमारास नितेश राणे यांची सुटका झाली. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, १८ डिसेंबर रोजी संतोष परब याच्यावर हल्ला झाल्यानंतर आज पर्यंत मी पोलिसांना सहकार्य करीत होतो. अशीच मदत यापुढेही करणार असून पोलिसांना आवश्यकता असेल तर तेव्हा तपासासाठी त्यांच्याकडे हजर राहणार आहोत. मी सलग दोन वेळा निवडून आलेला विधिमंडळाचा सदस्य असून जबाबदारीने वागणे माझ्या कडून अपेक्षित आहे. त्यामुळे पोलीस तपासात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

मला अटक करण्यात पोलिसांना अपयश

अटकेपासून मी कधीही पळण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या दिवशी कणकवली न्यायालयात मी शरण गेलो, तेव्हा माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे आणखी चार दिवसांचे संरक्षण होते. परंतु जिल्हा न्यायालयातील नियमित जामीनाच्या सुनावणीवेळी कोर्टाबाहेर जो प्रकार घडला, माझी गाडी अडवण्यात आली, तसेच माझ्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील जनतेला माझ्यामुळे कुठेही त्रास होऊ नये, तसेच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था खराब होऊ नये म्हणून कुटुंबीयांशी आणि वकिलांशी चर्चा करून मी स्वतः सरेंडर झालो. पोलिसांनी मला अटक केलेली नाही, हे सरकार मला अजून पर्यंत अटक करू शकलेले नाही असे नितेश राणे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!