कुडाळ, देवगडमध्ये महाविकास आघाडी अभेद्य राहणार की भाजप चमत्कार घडवणार ?

नगराध्यक्ष निवडणूकीसाठी भाजपकडून कुडाळ मध्ये प्राजक्ता बांदेकर तर देवगडमध्ये प्रणाली माने यांना उमेदवारी

देवगड मध्ये साक्षी प्रभू तर कुडाळ मध्ये आफ्रिन करोल यांची महाविकास आघाडीकडून नामनिर्देशनपत्र दाखल

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत भाजपला देवगड आणि कुडाळ नगरपंचायतमध्ये फटका बसला आहे. भाजपच्या ताब्यातील या दोन नगरपंचायती शिवसेना आणि महाविकास आघाडीकडे जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पक्षीय बलाबलात येथे महाविकास आघाडीला अनुकूल परिस्थिती आहे. या दोन्ही नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक येत्या १४ फेब्रुवारी रोजी होत असून नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी भाजपने दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करत येथील नगराध्यक्ष निवडणूकीची रंगत वाढवली आहे. त्यामूळे कुडाळ, देवगड मध्ये भाजपा चमत्कार घडवणार की महाविकास आघाडी बाजी मारणार ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी, कुडाळ आणि दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. निवडणुकीपूर्वी या चारही नगरपंचायतींवर राणेसमर्थक पर्यायाने भाजपाची सत्ता होती. मात्र यंदाच्या निवडणूकीत कुडाळ आणि देवगड नगरपंचायतींवर बहुमत राखण्यात भाजपाला अपयश आले आहे. कुडाळ मध्ये १७ पैकी ८ जागांवर भाजपाने विजय मिळवला असून ७ जागांवर शिवसेना विजयी झाली आहे. तर दोन जागा अनपेक्षितपणे राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. काँग्रेसने येथून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोन जागांवर विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीत येण्यासाठी काँग्रेसने कुडाळ मध्ये नगराध्यक्षपदाची मागणी केली आहे.

कुडाळ नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कुडाळ नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करून महाविकासआघाडी समोर आव्हान निर्माण केले आहे.

देवगड नगरपंचायतीवर शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. यापूर्वी या नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता होती. मात्र यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने या ठिकाणी एका जागेवरून ८ जागांवर झेप घेतली असून भाजपाला देखील ८ जागांवर समाधान मानावे लागले तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी केल्याने नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

या दोन्ही नगरपंचायतींसाठी मंगळवारी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. कुडाळमध्ये शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला असून काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी मंगळवारी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले. याचवेळी भाजपानेही प्राजक्ता आनंद शिरवलकर यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. देवगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन केले असतानाही भाजपाला येथून नगराध्यक्ष पदाची अपेक्षा आहे. त्यामुळे या नगरपंचायती मधून शिवसेनेच्या साक्षी प्रभू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपानेही प्रणाली माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. कुडाळ आणि देवगड नगरपंचायत मध्ये भाजपाला सत्ता स्थापण्यासाठी एक – एक नगरसेवक आवश्यक आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा चमत्कार घडणार की महाविकास आघाडी आपले वर्चस्व कायम राखणार ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

देवगड नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या प्रणाली माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे
देवगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या साक्षी प्रभू यांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!