भुयारी गटारसाठी आमदारांनी आणलेला ९ कोटीचा निधी व्याजाला लावला काय ?
तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना राजन वराडकर, गणेश कुशेंचा सवाल
भुयारी गटारसाठी निधी असूनही काम पूर्ण करण्यात महेश कांदळगावकर अपयशी
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरातील भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी ९ कोटी रुपयांचा निधी आणूनही गेल्या पाच वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्यात तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना यश आलेले नाही. त्यामुळे आमदारांनी आणलेला निधी तत्कालीन नगराध्यक्षांनी व्याजाला लावला का ? असा खोचक सवाल माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गणेश कुशे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भुयारी गटार योजनेच्या प्रश्नावर आम्ही यापूर्वीच उपोषण करून ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची मागणी केली होती. मात्र आता आमदार वैभव नाईक यांनीच या कामाबाबत नाराजी व्यक्त करत ठेकेदाराकडून योजनेचे काम काढून घेण्याचे संकेत देत आमच्या मागणीवर शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.
माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी हॉटेल कान्हा रसोई येथे पत्रकार परिषद घेऊन मालवण शहरातील भुयारी गटार योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत टीका केली. यावेळी राजन वराडकर म्हणाले, भुयारी गटार योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत आम्ही वेळोवेळी आक्षेप घेतला, उपोषणही केले. भुयारी गटारी योजनेच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची मागणीही आम्ही केली होती. मात्र त्याकडे सत्ताधारी व प्रशासनाने लक्ष दिले नाही. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही आमदार नाईक यांनी या ठेकेदारास ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची सूचना केली होती. मात्र त्या बैठकीस उपस्थित असलेले व भुयारी गटार योजनेचे काम पाहणारे नगरपालिकेचे अवेक्षक यांनी याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले. या योजनेचे काम दोन वर्षे ठप्प असूनही बारीकसारीक कामे केल्याचे भासवून ठेकेदाराने नगरपालिकेकडून बिले घेतली. ही बिले कोणी काढली ? यामागचे अर्थकारण काय ? यापूर्वी योजनेचे काम ८० ते ८५ टक्के पूर्ण झाले असताना उर्वरित प्रलंबित कामासाठी आमदारांनी ९ कोटींचा निधी उपलब्ध करून देखील नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे काम गेल्या पाच वर्षात पूर्ण का करू शकले नाहीत ? कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर एकदाही दंडात्मक कारवाई का झाली नाही ? असे सवाल यावेळी राजन वराडकर यांनी उपस्थित केले. आता आमदार वैभव नाईक यांनीच भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत त्याच्याकडून काम काढून घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आम्ही यापूर्वी केलेल्या मागण्यांवर आम. नाईक यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. आमचे आक्षेप योग्यच होते हे स्पष्ट झाले आहे, असेही वराडकर म्हणाले.
नगराध्यक्ष आणि कंपनीची कामे स्वतःच्या फायद्यासाठी
नगरपालिका नजीकच्या उद्यानाच्या सुशोभीकरणाचा आराखडा नगरपालिका सभेसमोर आणणे गरजेचे होते. मात्र जाणीव पूर्वक तो आणला नाही. स्थायी समिती समोरही हा आराखडा न ठेवता गुपचुप निविदा काढण्यात आली. निविदा प्रसिद्ध झाल्यावर आम्ही त्यास आक्षेप घेत उद्यानातून जाणाऱ्या प्रस्तावित केलेल्या रस्त्याबाबत हरकत घेतली होती. जोशी कुटुंबीयांनी देखील हरकत घेतली. आम्ही याबाबत आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने आराखड्यातून तो रस्ता रद्द केला. तो रस्ता चुकीचा होता त्यामुळेच प्रशासनाला रद्द करावा लागला. मग हा रस्ता कोणाच्या स्वार्थासाठी प्रस्तावित करण्यात आला होता आणि आवश्यक होता तर रद्द का केला ? असे सवाल वराडकर यांनी उपस्थित करत नगराध्यक्ष व कंपनी स्वतःच्या फायद्याची कामे करत होते हे सिद्ध होते असा आरोप केला.