कोणताही गुन्हा केला नाही, जनआशीर्वाद यात्रा ठरल्या नुसार होणारच !
नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया
चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात शिवसेने कडून ठीकठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ना. राणेंनी चिपळूण मध्ये पत्रकारांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे मला अटक होण्याचा प्रश्नच नसून माझी बदनामी केल्यास मीडियावर गुन्हा दाखल करू, असा इशारा राणेंनी दिला आहे.
चिपळूणमध्ये नारायण राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती अद्याप मला मिळाली नसल्याचे सांगून मी कॅबिनेट मंत्री आहे. मला अटक करणे सोपे आहे का ? कोणत्या तरी पोलीस आयुक्ताने गुन्हा दाखल झाल्याचे म्हटले म्हणून तो काय पंतप्रधान आहे की राष्ट्रपती आहे. माझी जनआशीर्वाद यात्रा ठरल्या प्रमाणे होणारच असल्याचे ते म्हणाले.