वाळूचे दर कमी करण्याचा निर्णय राज्यासाठी ; वैभव नाईकांनी फुकाचे श्रेय घेऊ नये

स्वतःचा सत्कार स्वत: करून घ्यायची आमदारांना जुनी सवय : अमित इब्रामपूरकर

मालवण : गगनाला भिडलेल्या वाळूच्या दरामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराने वाळू खरेदी करण्याची वेळ आली होती. त्यामुळे शासन स्तरावरून वाळूचे दर कमी करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे विधानसभेत जिल्ह्याच्या वाळूदर विषयावर कधी न बोलणार्‍या आमदार वैभव नाईक यांनी स्वत: श्रेय घेवू नये, अशी टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वाळूदर कमी केले असे आमदार जनतेला भासवत आहेत. विधानसभेच्या सभागृहात अन्य जिल्ह्यातील आमदारांनी चोरट्या वाळूबाबत आवाज उठवला होता, तेव्हा आमदार नाईक गप्प होते. आमदार वैभव नाईक यांना फुकाचे श्रेय घेत स्वत:चा सत्कार स्वत: करून घ्यायची जुनी सवय आहे. या अगोदर एलईडी मासेमारीवर बंदीचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला होता, त्याचेही श्रेय आम. नाईक यांनी घेतले होते.

राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच घेण्यात आला. राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय दि. ३०/०९/२०१९ व दि. २१ /०५ /२०१५ अशा या दोन शासन निर्णयांद्वारे धोरण निश्चित करण्यात आले होते. हे धोरण रद्द करण्यात येवून नवीन धोरण मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी फुकाचे श्रेय घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वाळूदर आपणामुळेच कमी केले गेले, असे जनतेला भासवण्याचा प्रयत्न करू नये, असेही अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!