जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे बिगुल लवकरच ; निवडणूक आयोग लागला कामाला !
सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितींची मुदत लवकरच संपत आहे. त्यामुळे या निवडणुका केव्हा जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लवकरात लवकर घेण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ८ ते १४ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील २५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत लवकरच संपुष्टात येत आहे. त्यामुळे याठिकाणी प्रशासक बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांना मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्षांकडून होत आहे. दोन वर्षात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने प्रभाग रचना जाहीर करून या निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. जाहीर होणाऱ्या प्रभाग रचनेवर अनेकांची गणिते मार्गी लागणार असल्याने या प्रभाग रचनांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर करण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ८ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर केली जाणार असून या प्रभाग रचनेकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.