चक्रव्यूहात अडकलेल्या आ. नितेश राणेंवर भाजपाचा विश्वास कायम !

मुंबई महापालिका मुख्य निवडणूक संचालन समितीत आ. राणे यांचा समावेश

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या आरोपांमुळे आ. नितेश राणे सध्या चक्रव्यूहात सापडले आहेत. हे प्रकरण आ. नितेश राणे यांना राजकीय वाटचालीला मारक ठरण्याचा कयास व्यक्त केला जात असला तरी भाजपा पक्षश्रेष्ठींनी मात्र आमदार राणेंवर विश्वास कायम ठेवला आहे. राजकिय दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने निवडणूक संचालन समिती गठीत केली असून आ. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय मुख्य समितीत आ. नितेश राणे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

कोकणातील भाजपचे एकमेव आमदार असलेले आमदार नितेश राणे विधानसभेतील डॅशिंग आमदार म्हणून ओळखले जातात. विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात मतदार संघाचे प्रश्न मांडण्या बरोबरच सत्ताधाऱ्यांना अंगावर घेण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींच्या विशेष मर्जीतील आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र अलीकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रचारा दरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यात पोलिसांनी आ. नितेश राणे यांचे नाव आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. त्यांनतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला. मात्र हा अर्ज देखील फेटाळण्यात आल्यानंतर आ. राणे यांनी कणकवली न्यायालयात शरण जाण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

एकंदर हे संपूर्ण प्रकरण आ. नितेश राणे यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी त्रासदायक ठरणार का ? असा प्रश्न निर्माण झाला असताना भाजपने मात्र आ. नितेश राणे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राजकीय दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई महापालिका निवडणूकीसाठी भाजपच्यावतीने आज विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्य निवडणूक संचालन समितीत आमदार नितेश राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. आ. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आ. राहूल नार्वेकर, आ. कालिदास कोळंबकर, प्रकाश मेहता आणि आ. नितेश राणे यांचा समावेश आहे. भाजपच्या वतीने जाहीरनामा समिती, प्रशासन समन्वय, प्रसारमाध्यम व समाज माध्यम, झोपडपट्टी संपर्क आणि संसाधन अशा समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!