नितेश राणेंना मोठा धक्का ; दोन दिवसांची पोलीस कोठडी
कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. न्यायालयात हजर झाल्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टानं त्यांना दोन दिवसांची म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नितेश राणे सकाळी कणकवली जिल्हा न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद सुरु होता. दरम्यान, संध्याकाळी ६ वाजता कोर्टाची वेळ संपण्यापूर्वी कोर्टानं सरकारी वकिलांचा युक्तीवाद मान्य करुन त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील प्रदीप धरत यांनी सरकाच्यावतीने नितेश राणे यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दरम्यान, कोर्टाबाहेर नितेश राणे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी काही विपरित घटना घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथकंही तैनात करण्यात आलं होतं.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर थेटपणे संशयाची सुई आली होती. पोलिस तपासातही त्यात पुरावे सापडल्याने नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. अज्ञातवासात राहून जिल्हा सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तरीही त्यांना पुन्हा एकदा कणकवली शरण येण्याची वेळ आली आहे.