उच्च न्यायालयातील अर्ज मागे घेत नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण !

पोलीस कोठडी की जामीन ? थोड्याच वेळात फैसला

कणकवली : सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेत आमदार नितेश राणे बुधवारी कणकवली न्यायालयात शरण गेले आहेत. त्यामुळे आता त्यांना पोलीस कोठडी मिळणार की जामीन याबाबतचा फैसला थोड्या वेळात होणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून मी शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने मला बेकायदेशीर अटक करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः न्यायालयाचा आदर ठेवून कणकवली न्यायालयात हजर होत असल्याची प्रतिक्रिया आ. नितेश राणे यांनी दिली.

भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवली न्यायालया समोर स्वतःहुन हजर झाले. बुधवारी दुपारी ३ वाजता ते कणकवली न्यायालया समोर हजर झाले. त्याच्या सोबत वकील संग्राम देसाई, वकील राजेंद्र रावराणे, वकील उमेश सावंत, वकील राजू परुळेकर उपस्थित आहेत. भाजपा पदाधिकारी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष समीर नलावडे, दिलीप तळेकर, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, संदीप सावंत, मिलींद साटम उपस्थित होते. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कणकवली मध्ये नरडवे नाका व कणकवली न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त पोलिसांनी ठेवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. न्यायालयात जाणाऱ्या गेटवर सर्वांना अटकाव येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!