व्यापारी एकता मेळाव्यास पाठिंबा ; पण इलेक्ट्रॉनिक्स दुकाने सुरूच राहणार
सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन राणे यांची माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यास सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे व्यापार उदीम ठप्प असताना व्यापारी मेळाव्या निमित्ताने दुकाने बंद ठेवण्यास आमचा विरोध असून जिल्ह्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स दुकाने सुरू ठेऊन आमचे सभासद ऑनलाईन स्वरूपात या मेळाव्यात सहभागी होतील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष राजन राणे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून सिंधुदुर्ग मधील सर्व व्यापारी बंधूना एकत्रित ठेवण्याचे चांगले काम करीत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग डीलर्स अससोसिएशनने स्थानिक व्यापारी बंधूंच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या सर्व संघटनाना कायमच पाठिंबा दर्शविला आहे. परंतु व्यवसाय बंद ठेऊन सहभाग या आवाहनाला सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स अससोसिएशनचा विरोध आहे. दोन वर्षात कोरोना महामारीमुळे आमच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील बहुतांश व्यापाऱ्यांचे फारच आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय बंद ठेवणे हे अयोग्य वाटते. तसेच सदर मेळावा हा व्हर्च्युअल (ऑनलाईन) पद्धतीने असल्याने आपण व्यवसाय चालू ठेवूनही मेळाव्यात सहभागी होऊ शकता. सिंधुदुर्ग डीलर्स अससोसिएशनच्या वतीने सदर जाहीर आवाहन करण्यात येते की, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य पुरवणारी आमची सर्व दुकाने सुरु राहुन ऑनलाईन लिंकवर जॉईन होऊन आमचे सर्व व्यापारी आपली बहुमूल्य उपस्थिती सिंधुदुर्ग व्यापारी महासंघ आयोजित व्यापारी एकता मेळाव्यास दर्शवतील, असे राजन राणे यांनी म्हटले आहे.