भाजपच्या प्रचारासाठी दत्ता सामंत मैदानात ; शिरवंडेच्या मेळाव्यातून फुंकले रणशिंग
कार्यकर्त्यांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन ; “गाव तेथे वाडी, वाडी तेथे भाजपा” मोहीम राबविण्याचे आवाहन
कुणाल मांजरेकर
मालवण : कार्यकर्त्यांचे प्रचंड पाठबळ लाभलेल्या भाजपा नेते दत्ता सामंत यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. श्री. सामंत यांच्या नेतृत्वाखाली आडवली मालडी मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी शिरवंडे येथे पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे ४०० हून भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवित जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी आडवली मालडी मतदार संघात “गाव तेथे वाडी आणि वाडी तेथे भाजपा” मोहीम राबवून आगामी निवडणुकीच्या निमित्ताने पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहन दत्ता सामंत यांनी केले.
शिरवंडे येथे दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने दत्ता सामंत पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसून आले. यावेळी पं. स. गटनेते सुनील घाडीगांवकर, उपसभापती राजू परुळेकर, जि. प. चे वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, बाळू कुबल, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाऊ सामंत, गोपी लाड, बाळा लाड, प्रशांत परब, विश्वास परब, जयेश घाडी, विजय लाड, मोहन सावंत, काका गावडे, चंदू पवार, नयन कुलकर्णी, भार्गव लाड, बाळा राऊत, निलेश बाईत, नंदू आंगणे, घनश्याम चव्हाण, भाई घाडीगांवकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, मंदार लुडबे यांच्या सह विभागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, कुठलाही रोप लावला की त्याचे वृक्षात रूपांतर होते. त्याचे जतन करणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्यात दुफकी निर्माण होऊन चालणार नाही. सिंधुदुर्गात आज अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मालवण तालुक्यातही तीन ते चार सरपंच पूर्ण बॉडीसह भाजपमध्ये येण्यास इच्छूक आहेत. उद्या आडवली मालडी विभागात पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या सर्वांनी पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. मुळात या मतदार संघात तुमचे मत विचारात घेतल्याशिवाय कुठलाही उमेदवार मी लादणार नाही, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करूनच निर्णय घेणार आहोत. कुणी माझ्या जवळचा म्हणून त्याला उमेदवारी मिळेल, असे समजू नका. निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवारी दिली जाणार आहे, असे दत्ता सामंत यांनी सांगून आपण सर्वजण एकाच कुटुंबातील आहोत. त्यामुळे आपल्या मतदार संघात हेवेदावे नको, या मतदार संघातील तीनही उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहेत, त्यासाठी काम करा, असे दत्ता सामंत म्हणाले.
एमएसएमई मार्फत आडवली-मालडीत उद्योग उभारूया
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या खात्याच्या अंतर्गत ८० % उद्योग धंदे येतात. त्यामुळे या मतदार संघात एखादा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देऊन त्यासाठी बाळू कुबल यांनी पुढाकार घेऊन समिती निवडावी. या समिती मार्फ़त विभागासाठी किमान १० कोटी पर्यंत योग्य तो उद्योग व्यवसाय निवडावा, त्यासाठी आवश्यक असलेले १० % भागभांडवल आपण सर्वजण मिळून उभारू. येथील फळप्रक्रिया, दुग्धव्यवसाय यावर पूरक उद्योग उभारल्यास या मतदार संघातील बेरोजगारी कायमस्वरूपी नष्ट होईल, असे दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी भाऊ सामंत, बाळा लाड, दादा परब, मोहन सावंत, दीपक पाटकर, महेंद्र चव्हाण आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसभापती राजू परुळेकर यांनी करून आभार मानले.
शिरवंडे शाखाप्रमुख भाजपच्या व्यासपीठावर !
शिरवंडे गावचे शिवसेना शाखाप्रमुख रघु गावकर यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थिती दर्शवली. यावेळी दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना त्यांनी सुनील घाडीगांवकर, सुशांत घाडीगांवकर यांचे कौतुक करून शिरवंडे मध्ये अजून १०, १५ नाही तर २५ वर्षे भाजप शिवाय अन्य कोणाची सत्ता येऊ शकत नाही, हे समजून चुकल्यानेच आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून या सर्वांसह आपण लवकरच प्रवेश करणार आहोत. यापुढे या विभागात फक्त नारायण राणे आणि भाजपचीच सत्ता दिसेल, असे रघु गावकर म्हणाले.