तोंडवळी रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी
आचरा : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तोंडवळी गावात जाणाऱ्या रस्त्याची पुर्णतः दुरावस्था झाली आहे. रस्त्यालगत टाकण्यात आलेली खडी रस्त्यावर येवून येथे अपघात होत असून शासनाने या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून हा रस्ता वाहतूकीस योग्य करण्याची मागणी तोंडवळी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तोंडवळी फाटा ते वाघेश्वर मंदिर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची पुर्णतः चाळण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याचा त्रास या रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकी, रिक्षा, कार अशा छोट्या वाहन चालकांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षी रस्त्याच्या बाजूला टाकलेले खडीचे ढीग तसेच असून अवजड वाहने ये जा करत असल्याने सदरची खडी रस्त्यावर येऊन अपघात होण्याची वेळ येत आहे. काही दिवसापूर्वी या खडीवरुन गाड्या घसरून अपघात झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तरी शासन, लोकप्रतिनिधींनी याची तातडीने दखल घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्याची मागणी तोंडवळी ग्रामस्थ प्रकाश पुजारे यांनी केली आहे.