“मुलगी झाली हो” मधल्या विलास पाटीलची स्टार प्रवाहने केली हकालपट्टी !

सोशल मीडियावरील राजकिय भूमिका पडली महागात

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या प्रसिद्ध मालिकेत विलास पाटीलच्या भूमिकेत असलेल्या किरण माने यांना सिरियलमधून काढून टाकण्यात आले आहे. सोशल मीडियावर राजकिय भूमिका घेतल्याने स्टार प्रवाहने ही कारवाई केली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींकडून स्टार प्रवाहच्या या कारवाईचं समर्थन केलं जात असंल तरी अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे हनन असल्याचे सांगत किरण माने यांना समर्थन दिलं आहे.

किरण माने हे स्टार प्रवाह मालिकेतील विलास पाटील या भूमिकेमूळे घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. ते सोशल मीडियावर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडत असल्यामूळे चर्चेत असतात. मात्र याच कारणातून त्यांची स्टार प्रवाह वरून हकालपट्टी झाली आहे. या कारवाई वरून त्यांनी संतप्त भूमिका व्यक्त केली आहे. ही झुंडशाही अशीच सुरु राहणार आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही. आम्ही जेंव्हा नाटकात काम करायचो तेंव्हा काँग्रेसवर इंदिरा गांधी, राजीव गांधींवर टीका करायचो. तेंव्हा काँग्रेसी नेते पण येऊन टाळ्या वाजवायचे. असं नव्हतं की तुम्ही आमच्यावर टीका करु नका वा अशाप्रकारची दहशत नव्हती. पण आता एक वाक्य जरी लिहीलं तरी ‘तुम्ही असं कसं लिहू शकता’ म्हणत दहशत माजवली जातेय.

मला बरंच ट्रोल केलं गेलं. बरीच घृणास्पद टीका केली गेली. त्यावेळी मी चिडून काही वक्तव्ये त्या ट्रोलर्सच्या विरोधात केलेली आहेत. पण कधीही कुणाचं नाव घेऊन अर्वाच्य शब्दात काही बोललेलो नाहीये. पण ही झुंडशाही आहे. पण मी केलेली पोस्ट्स तिरकस होती की, ‘आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो..’ अशी माझी पोस्ट्स होती. त्या पोस्ट्बाबत यांनी लावून घेतलं की, हे आमच्या नेत्याला बोलले. म्हणून त्यांनी अक्षरश: स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं की यांना सिरियलमधून काढून टाकण्यात यावं. मला असं वाटत होतं की, महाराष्ट्रात असं नाही होणार. अशाप्रकारची झुंडशाही बिहार-यूपीमध्ये चालू शकते. पण माझ्याबाबतीत असं झालंय आणि मी बळी पडलोय. पण ठिक आहे मी यातून उभा राहिन. मी खंबीर आहे. हा माझा अभिनय क्षेत्रातला झालेला खून आहे. हे मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. पण आता लोकांनी ठरवायचंय की, आपण आता काय करायचंय, असंही ते म्हणाले आहेत.


फेसबुकवर त्यांनी उद्वेगाने पोस्टही केली आहे. “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा…
गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !” असं त्यांनी टाकलंय.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!