किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात आर्थिक गैरव्यवहार ? पं. स. सभेचा चौकशीचा ठराव

केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडे चौकशीसाठी मागणी करणार : सुनील घाडीगांवकर आक्रमक

कुणाल मांजरेकर

मालवण : तालुक्यातील किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रात स्थानिक कमिटी मार्फत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केला आहे. याबाबत चौकशी करण्याचा ठराव पंचायत समिती सभेत संमत करण्यात आला आहे. हा ठराव आपण स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सादर करून चौकशीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. या सभेत सुनील घाडीगांवकर यांनी तालुक्यातील किर्लोस कृषि विज्ञान केंद्रात गेल्या काही वर्षात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. किर्लोस गावातील स्थानिक शेतकर्‍यांनी किर्लोस कृषि विज्ञान केंद्रासाठी मोफत जमिन उपलब्ध करून दिली. या केंद्रात स्थानिक तरुणांना नोकर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षात हे कर्मचारी आठ ते दहा हजारामध्ये काम करत आहेत. या कृषि केंद्राची जी स्थानिक कमिटी आहे. त्यांचे सदस्य या कर्मचार्‍यांच्या पगारातील कमिशन लाटत असल्याचा आपला प्राथमिक संशय असल्याचे सुनील घाडीगांवकर म्हणाले.

स्थानिक शेतकर्‍यांसह परिसरातील शेतकर्‍यांना या कृषि विज्ञान केंद्राचा फायदा व्हावा यासाठी शेतकर्‍यांनी १५ ते २० एकर क्षेत्र मोफत या केंद्रासाठी उपलब्ध करून दिले. मात्र किरकोळ उपक्रम राबविण्यापलिकडे या केंद्राकडून म्हणावा तसा शेतकर्‍यांना फायदा झालेला नाही. शिवाय कृषि विज्ञान केंद्राचे महाविद्यालय हे या केंद्राच्या परिसरात करणे आवश्यक असताना ते सिंधुदुर्गनगरी येथील जैतापकर कॉलनी परिसरात करण्यात आले आहे. मग जर अन्य ठिकाणी महाविद्यालय न्यायचे होते तर शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात जमीन मोफत का घेण्यात आली ? हे महाविद्यालय जर किर्लोस गावात झाले असते तर त्याचा शेतकर्‍यांबरोबर स्थानिक व्यावसायिकांना फायदा झाला असता. मात्र ते अन्यत्र हलविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून घेण्यात आलेली जमिन पुन्हा शेतकर्‍यांना परत करण्यात यावी अशी मागणी श्री. घाडीगावकर यांनी केली. गेल्या काही वर्षात या कृषि विज्ञान केंद्रात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. या केंद्रात राबविल्या जाणार्‍या योजना या केंद्रामार्फत राबविल्या जात आहे. मात्र त्याचा फायदा स्थानिक पातळीवर होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे स्पष्ट करत तसा ठराव श्री. घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत घेतला. हा ठराव आपण स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे देत याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी करणार असल्याचे श्री. घाडीगावकर यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!