Exclusive : सुशिक्षित बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी गावोगावी कर्ज मेळावे घेणार !

जिल्हा बँकेचे नूतन संचालक बाबा परब यांची माहिती

मतदारांचे मानले आभार ; प्रत्यक्ष घरी जाऊन आशीर्वाद घेणार

कुणाल मांजरेकर

मालवण : सध्या युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास दीडशे सुशिक्षित बेरोजगार संस्था असून या युवकां बरोबरच शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून गावोगावी कर्ज मेळावे घेऊन नवीन योजना त्यांच्यासाठी राबवण्याचा मानस सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक संदीप उर्फ बाबा परब यांनी व्यक्त केलाय. मी स्वतः बेरोजगार फेडरेशनचा अध्यक्ष आहे, त्यामुळे ज्या मतदारांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला विश्वासाने निवडून दिलेय, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी बँकेमार्फत कशी मदत करता येईल, यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार, असेही ते म्हणाले. जिल्हा बँकेच्या संचालक पदी निवड झाल्यानंतर बाबा परब यांनी “कोकण मिरर” शी दिलखुलास संवाद साधला. दरम्यान, मला प्रतिष्ठेच्या लढतीत मला निवडून देणाऱ्या मतदारांचा मी सदैव ऋणी आहेच. त्यांचे आभार मानण्या बरोबरच पुढील वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक मतदाराच्या घरी जाणार असल्याचेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप उर्फ बाबा परब हे विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था मतदार संघातून निवडून आले आहेत. या निवडीनंतर त्यांनी “कोकण मिरर” शी दिलखुलास संवाद साधला. केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माझे सर्वेसर्वा माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली मला भाजपा कडून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची उमेदवारी देण्यात आली. मला मिळालेला मतदार संघ खरं तर प्रतिस्पर्धी उमेदवार मर्गज यांच्या कुटुंबीयांचा बालेकिल्ला आणि पारंपरिक मतदार संघ होता. गेली तीस वर्षे ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. हाऊसिंग सोसायटींवर देखील त्यांचेच वर्चस्व आहे. अशा पार्श्वभूमीवर हा मतदार संघ मला देण्यात आला. पक्षाचा आदेश आणि पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास याच्या बळावर मीदेखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. गेली दहा वर्षे मी सुशिक्षित बेरोजगार फेडरेशनचे अध्यक्ष आहे. त्यामुळे या मतदारसंघात माझी स्वतःची काही मतं होती. तसेच आठ पैकी सात तालुक्यात भाजपाचे नगराध्यक्ष असल्याने खऱ्या अर्थाने मला विजयासाठी त्यांचा उपयोग झाला. सावंतवाडीत संजू परब, कणकवलीत समीर नलावडे, गोट्या सावंत, बंडू हर्णे, बंडू गांगण, मिलिंद मेस्त्री अशा पदाधिकाऱ्यांची साथ माझ्या सोबत होती. ज्या ठिकाणी गरज लागेल तिकडे आमदार नितेश राणे माझ्यासाठी स्वतः फोन करत होते. राणे साहेबांचा फोन गेल्यावर समोरील उमेदवार देखील आपलं मत बदलत होता. आदरणीय रवींद्र चव्हाण, निलेश राणे हे देखील माझ्या विजयासाठी प्रयत्न करीत होते. वेंगुर्लेतून नगराध्यक्ष राजन गिरप, सुहास गवंडकर कुडाळमध्ये ओंकार तेली, विनायक राणे, राकेश कांदे, बंड्या सावंत आणि इतर सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्यासाठी मेहनत घेत होते. त्यामुळे मला या निवडणुकीत काम करताना पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप मोठं सहकार्य मिळाले, म्हणूनच माझा विजय सोपा झाला, असे बाबा परब म्हणाले.

माझे राजकीय गुरू अशोक सावंत, ज्यांनी राजकारणात मला प्रेरणा दिली. मी काँग्रेस मध्ये कार्यरत असताना मला राणेसाहेबांकडे नेणारे माझे गुरू अशोक सावंत यांचा मी मनापासून आभारी आहे. त्यांच्यासह माझ्या मालवण मधील टीमने माझ्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महेश मांजरेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, संतोष साटविलकर या सर्वांनी मला सहकार्य केलं, म्हणून माझा विजय होऊ शकला.

“त्यावेळी दीपक परब, अशोक सावंत यांनी साथ दिली नसती तर….”

बाबा परब यांनी जिल्हा बँकेची उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. भाजपाकडून आपणाला उमेदवारी मिळाल्यानंतर ३० तारीख पर्यंत थकबाकी असता नये, अशी उमेदवारांसाठी अट होती. माझी जिल्हा बँकेकडे कोणतीही थकबाकी नव्हती. परंतु मी अनेकांना जामीन होतो. तरीही बँकेकडून माझी थकबाकी नसल्याचे पत्र २८ रोजी मला देण्यात आले. मात्र बँकेने अचानक ३० तारीखला माझी थकबाकी असल्याचे पत्र सादर केले. यावेळी काही लाखांची रक्कम एका दिवसात भरणे आवश्यक होते. माझा उमेदवारी अर्ज अचानक बाद करण्याचीही रणनीती होती. जामीनदारांचे पैसे थकित असल्याचे कारण पुढे करून हे षड्यंत्र आखण्यात आले होते. मात्र अशावेळी माझ्या संकटाला धावून आले ते माझे सर्वेसर्वा आणि बिझनेस पार्टनर दीपक परब ! दीपक परब आणि अशोक सावंत यांनी तात्काळ सदरील रक्कम बँकेत भरणा केली. त्यामुळेच मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उभा राहू शकलो. त्यामुळे या दोन्ही व्यक्तींचे ऋण मी कधीही विसरणार नाही, अशी भावना बाबा परब यांनी व्यक्त केली.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3849

Leave a Reply

error: Content is protected !!