आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने भाजपकडेच !
केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा विश्वास ; जिल्हा बँकेतील उत्साह कायम ठेवण्याचे आवाहन
कणकवली : आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक सत्तास्थाने भाजपकडेच असतील असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच बहुमताने विजयी होणार असून तुम्हा कार्यकर्त्यांच्या कामावर आणि मेहनतीवर माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. जिल्हा बँक निवडणुकीत यश मिळविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि उत्साह कायम ठेवा आणि काम करा, असे आवाहनही ना. राणे यांनी केले.
ओरोस महिला भवन येथे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जयदेव कदम, संदीप कुडतरकर, संजना सावंत, रणजीत देसाई, भाई सावंत आदींसह सर्व सभापती, नगराध्यक्ष, आणि सर्व विभागाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी अध्यक्ष उपस्थित होते.
कोणतीही निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी अवघड नाही. मात्र बेसावध राहून निवडणूक सोपी समजू नका. प्रत्येक वेळी सावध राहून काम करा. कामात सातत्य ठेवा. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तत्पर राहा. प्रत्येक वेळी यश तुमचेच असेल असा विजयाचा कानमंत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूकी बाबतचा निर्णय केंद्रीय मंत्री नारायण राणे घेणार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.