मनीष दळवींच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ ; उपाध्यक्ष पदी अतुल काळसेकर
महाविकास आघाडीत फाटाफूट ; काँग्रेसच्या संचालक नीता राणे अनुपस्थित
सिंधुदुर्ग : येथील जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अपेक्षितपणे विजय मिळवला आहे. शेवटपर्यंत उत्सुकता लागून राहिलेल्या बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी अध्यक्ष तर उपाध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांची वर्णी लावण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने व्हिक्टर डान्टस व सुशांत नाईक यांचे उमेदवारी अर्ज दाखल करून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडीतच फाटाफूट झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या संचालक नीता राणे या निवडणुकीपासून विभक्त राहिल्या. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांनी ११ विरुद्ध ७ मतांनी विजय मिळवला आहे.
या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळ प्रांत अधिकारी वंदना खरमळे यांनी करताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. बहुमत नसतांनाही महाविकास आघाडीने अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाची निवड प्रतिष्ठेची केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. हे मतदान गुप्त पध्दतीने करण्यात आले. निवडीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बँकेला भेट देऊन नूतन अध्यक्ष – उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.