नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली !
मनीष दळवीनाही तूर्तास दिलासा ; अटकेपासून संरक्षण
कुणाल मांजरेकर
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बुधवारी ही सुनावणी व्हर्च्युअल स्वरूपात घेण्यात आली. मात्र निर्धारित वेळेत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पुढील सुनावणी उद्या (गुरुवारी) दुपारी १ वाजता घेण्यात येणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हा बँकेचे संचालक मनिष दळवी यांनाही उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उद्या बँकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मनिष दळवींना मतदानासाठी उपस्थित राहता यावे, यासाठी यांना अटक न करण्याची हमी पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली आहे.
आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही सुनावणी व्हर्च्युअल स्वरूपात घेण्यात आली. सध्या दुपारी १२ ते ३ या वेळेत उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. आमदार नितेश राणे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना विधान भवनातील म्याव म्याव प्रकरणामुळे नितेश राणे यांना राजकीय हेतूने या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे सांगितले. १८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर २३ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनात म्याव म्याव प्रकरण घडले. त्यानंतर २४ डिसेंबरला सिंधुदुर्ग पोलिसांनी संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणे यांना नोटीस बजावली. त्यामुळे राजकीय हेतूने हा प्रकार घडल्याचा दावा नितेश राणे यांच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, बुधवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने याची पुढील सुनावणी गुरुवारी दुपारी १ वाजता घेण्यात येणार आहे. तर जिल्हा बँकेचे संचालक मनीष दळवी यांच्यावरही याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील सुनावणी अद्याप अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर उद्या होणार्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणुकीत मनीष दळवी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता त्यांना अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी त्यांच्या वकिलां मार्फत उच्च न्यायालयात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मनीष दळवी यांना तूर्तास अटक करणार नाही, अशी हमी न्यायालयात दिली आहे. त्यामुळे मनीष दळवी यांनाही तूर्तास दिलासा मिळाला आहे.