पर्ससीन धारकांच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा ; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिली भेट
नव्या मासेमारी कायद्यातील त्रुटींची दिली कबुली ; मत्स्यव्यवसाय राज्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन धारक मच्छिमारांनी आपल्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ मागील बारा दिवसां पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या मच्छीमारांची भेट घेतल्यानंतर राज्यातील सत्ताधारी प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी बुधवारी मालवण येथे पर्ससीन मच्छिमारांच्या साखळी उपोषणाला भेट दिली. नवीन मासेमारी कायदा बनवताना त्यामध्ये त्रुटी राहिल्याची कबुली देतानाच या कायद्यात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. दरम्यान, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी पर्ससीन मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना मुंबईत पाचारण करावे किंवा मंत्री महोदयांनी येथे येऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, अशी मागणी अमित सामंत यांनी केली आहे.
सर्व मच्छीमार जगले पाहिजेत. हीच राष्ट्रवादी म्हणून आमची भूमिका आहे. गेले १२ दिवस सिंधुदुर्गातील आधुनिक यांत्रिक रापणकर मच्छीमार आपल्या विविध मागण्यांसाठी करत असलेल्या साखळी उपोषणाचा विचार करता समनव्यातून तोडगा निघाला पाहिजे, यासाठी मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा लवकरच सिंधुदुर्ग दौरा आयोजित केला जाईल. पर्ससीन व पारंपारिक या वादात न पडता दोन्ही मच्छीमारांची भूमिका जाणून घेऊन योग्य तो तोडगा काढण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे अमित सामंत म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने नवीन सुधारित मच्छीमार कायद्यातील जाचक अटीं विरोधात मालवण येथील सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग समोर सिंधुदुर्गतील पर्ससीन मच्छीमारांनी १ जानेवारी पासून साखळी उपोषण छेडले आहे. बाराव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. या पर्ससीन मच्छीमारांच्या उपोषण आंदोलनाला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी बुधवारी भेट देऊन उपोषण कर्त्यांशी चर्चा करत भूमिका जाणून घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, बाळ कनयाळकर, आगोस्तीन डिसोझा, सदानंद मालंडकर, बाबू डायस, अंथॉनी फर्नांडिस, प्रमोद कांडरकर, नाझीर शेख, सदफ खटखटे, सखीना खान यासह राष्ट्रवादी पदाधिकारी तसेच उपोषणकर्ते पर्ससीन मच्छीमार अशोक सारंग, कृष्णनाथ तांडेल, बाबला पिंटो, सतीश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, जॉन नऱ्होना यासह मालवण, वेंगुर्ला, देवगड येथील पर्ससीन मच्छीमार उपस्थित होते.
यावेळी अशोक सारंग, कृष्णनाथ तांडेल यांनी पर्ससीन मच्छीमारांची भूमिका स्पष्ट करत विविध कागदपत्रे, अहवाल सामंत यांच्यासमोर मांडले. होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली. यावेळी सामंत यांनी मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत पर्ससीन मच्छीमारांच्या मागण्या व सुरू असलेल्या उपोषणाची माहिती दिली. मच्छीमारांशीही संवाद घडून आणत मुंबई मंत्रालयात मच्छीमार प्रतिनिधी यांच्याशी एकत्रित बैठक अथवा राज्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग दौरा करावा याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
शासनापर्यंत मच्छीमारांना घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील
मासेमारी व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. पर्ससीन मासेमारीवरही अनेक कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळे कोणत्याही वादात न पडता समन्वयातून तोडगा काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांचा असेल. म्हणूनच शासनापर्यंत या मच्छीमारांना घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.