राजन तेली यांची पर्ससीन मच्छिमारांच्या उपोषणस्थळी भेट ; राज्य शासनाने सुवर्णमध्य काढावा !

पारंपरिक व पर्ससीन दोघाही मच्छीमारांचे नुकसान नको हीच आमची भूमिका : राजन तेली

मालवण : पर्ससीन मच्छीमार हे स्थानिक असून पूर्वीचे पारंपरिक मच्छीमार आहेत. त्यामुळे नव्या मासेमारी कायद्याची अंमलबजावणी करताना पारंपरिक अथवा पर्ससीन अश्या कोणत्याही मच्छीमारांचे नुकसान होणार नाही, याचा कायदेशीर अभ्यास करून राज्य शासनाने सुवर्णमध्य काढावा, अशी भूमिका भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मालवण येथे मांडली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने नवीन सुधारित मच्छीमार कायद्यातील जाचक अटीं विरोधात मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग समोर सिंधुदुर्गातील पर्ससीन धारक मच्छीमारांनी शनिवार १ जानेवारी पासून साखळी उपोषण छेडले आहे. शुक्रवारी सातव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. लोकशाही पद्धतीचा आधार घेऊन अत्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या उपोषणाला अनेक स्तरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान या उपोषण आंदोलन स्थळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शुक्रवारी भेट देऊन मच्छीमारांशी चर्चा केली. यावेळी जेष्ठ मच्छीमार नेते कृष्णानाथ तांडेल, अशोक सारंग, सहदेव बापर्डेकर, जॉन नरोना, बाबला पिंटो यासह मालवण, देवगड, वेंगुर्ले येथील पर्ससीन मच्छीमार उपस्थित होते.

उपोषणकर्ते मच्छीमार यांनी तेली यांना सविस्तर माहिती दिली. पर्ससीन मच्छीमार यांना मासेमारी साठी (सप्टेंबर ते डिसेंबर) हा अत्यंत अल्प कालावधी निश्चित करण्यात आला आहे. एवढया अल्प कालावधीत वादळ, पाऊस यांना सामोरे जात अनेक निर्बंधांसह मासेमारी करायची कशी ? लाखोंची कर्जे, खलाशी व अन्य कामगार यांचा खर्च भागवायची कसा याचे उत्तर राज्य शासन देणार का ? १ जानेवारी पासून महाराष्ट्र जलधी क्षेत्रात पर्ससीन मासेमारीला बंदी असताना हे मच्छीमार राज्य बाहेरील (१२ नॉटिकल मैल) क्षेत्रात मासेमारीस जात असतील तर त्यांनाही राज्याच्या जलधी क्षेत्रातून प्रवास करण्यास बंदी. हे कोणत्या नियमात बसणारे आहे. नव्या मासेमारी कायद्यातील नियम-अटी या पर्ससीन मच्छीमाराना मारक आहेत. पर्ससीन मच्छीमार, त्यांचे कुटुंब यांना देशोधडीला लावण्याचे काम राज्य शासन करत आहे. तरी कायदा सर्वाना समान हवा. कोणावरही अन्याय होता नये. पारंपरिक व पर्ससीन हे सर्व स्थानिक मच्छीमार आहेत. हा एक विचार करून योग्य पध्दतीने अभ्यासपूर्वक कायदा अंमलबजावणी गरजेचे आहे. याबाबत पर्ससीन मच्छीमार व राजन तेली यांच्यात चर्चा झाली.

शिवसेनेने सर्व ठिकाणी समान भूमिका घ्यावी

पारंपरिक व पर्ससीन मासेमारी बाबत शिवसेना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच वेगवेगळी भूमिका घेत आली आहे. तरी वाद-विकोप न होता सामोपचाराने व कायद्याचा योग्य आधार घेऊन निर्णय झाल्यास योग्य ठरेल. पारंपरिक मच्छीमार यांचेही नुकसान होता नये ही आमची भूमिका आहेच. त्या बरोबर ज्या पर्ससीन मच्छीमाराना राज्य शासनाने परवानगी दिली. त्यांच्यावर आता निर्बंध घातले जात असतील तर त्यांनी काढलेली लाखों रुपयांची कर्जे व अन्य बाबींचाही शासनाने विचार करावा. नवे कायदे आणताना कायदेशीर बाबींचा योग्य अभ्यास करून राज्य शासनाने निर्णय घ्यावा. अशी भूमिका राजन तेली यांनी मांडली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!