मालवणात ८,९ जानेवारीला कृष्णांक महोत्सव २०२२

स्वराध्या फाउंडेशनचे आयोजन ; सुशांत पवार, अभय कदम यांची माहिती

मालवण : मालवण येथील स्वराध्या फाउंडेशनच्या वतीने यावर्षी ८ आणि ९ जानेवारीला नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात कै. रुक्मिणी कृष्णा नेवगी आणि कृष्णा पांडुरंग नेवगी यांच्या स्मरणार्थ “कृष्णांक महोत्सव – २०२२” चे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे पदाधिकारी सुशांत पवार, अभय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भरड येथील हॉटेल ऊबंटू येथे ही पत्रकार परिषद झाली. यावेळी रुपेश नेवगी, शांती पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्वराध्या फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी एकांकिका स्पर्धा आयोजित केली जात होती. मात्र यावर्षी कोरोना, ओमीक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याने एकांकिका, दीर्घांक आणि नाटक अशा तिन्ही नाट्यप्रकारांचा एकत्रित महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा कृष्णांक महोत्सव ८, ९ जानेवारीला पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन ८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता, संस्कार भारती, पुणे निर्मित ‘द प्लॅन/रॅन्ड वध, जॅक्सन वध’, (दीर्घांक) सादर होईल. याचे लेखक – योगेश सोमण, दिग्दर्शक – योगेश सोमण, रश्मी देव आहेत. सायंकाळी ७.३० वाजता समांतर सांगली, निर्मित “समांतर” (एकांकिका) लेखक दिग्दर्शक इरफान मुजावर सादर होईल. रात्री ८.३० वाजता, इंडियन पीपल्स थिएटर अकादमी (ipta) पुणे निर्मित ‘मी भारतीय’,(दीर्घांक), लेखक प्रदिप तुंगारे, दिग्दर्शक रवींद्र देवधर सादर होईल. ९ जानेवारीला सकाळी १० वाजता कलांकुर ग्रुप मालवण निर्मित, ‘सायलेंट स्क्रीम’, (एकांकिका), लेखक सिद्धार्थ साळवी, दिग्दर्शक सचिन टिकम सादर होईल. सकाळी ११ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ निर्मित ‘आहे मनोहर तरी’ (दीर्घांक), लेखक, दिग्दर्शक – वर्षा वैद्य सादर होईल. दुपारी १२ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ निर्मित ‘बोझं’ (एकांकिका), लेखक – नागसेन सपकाळे,दिग्दर्शक – केदार सामंत सादर होईल. सायंकाळी ७ वाजता अभिनय, कल्याण निर्मित ‘सायलेन्स मॅटर चालू हाय’, लेखक – कै. रमेश पवार /महेश निकम, दिग्दर्शक – अभिजित झुंजारराव सादर होईल. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा महोत्सव पार पाडला जाणार आहे. या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वराध्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!