सिंधुदुर्गात राजकारणाची पातळी घसरली ; बदनामीसाठी “बनावट” मिडीयाचा वापर ?

“सिंधुदुर्ग ब्रेकींग न्यूज” च्या नावाखाली शिवसेनेत अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न

पोलिसांत तक्रार दाखल करणार : शिवसेना नेते सतीश सावंत यांची माहिती

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस राजकारणाची पातळी घसरत चाललीय का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या आदल्या रात्री एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडिया वरून प्रसारित झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी बनावट ई मीडियाचा आधार घेऊन जिल्हा बँकेतील महाविकास आघाडीचे पॅनलप्रमुख, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या बाबत संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्याची घटना घडली आहे. “सिंधुदुर्ग ब्रेकिंग न्यूज” या नावाखाली प्रसारित करण्यात आलेल्या या वृत्ताला सतीश सावंत यांनी हरकत घेतली असून या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे श्री. सावंत यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मतदानाच्या आदल्या रात्री एका राजकिय पक्षाच्या उमेदवाराचा आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध करून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये एका महिलेला देखील गोवण्यात आले होते. या प्रकाराबाबत राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असताना “सिंधुदुर्ग ब्रेकिंग न्यूज” या खोट्या चॅनलच्या फेसबुक अकाउंट वरून आता शिवसेना नेते सतीश सावंत यांच्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पक्षातील गद्दारीमुळे आमचा पराभव झाल्याचे वाक्य सतीश सावंत यांच्या नावे चालवून आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यावर सतीश सावंत यांच्या तोंडून आरोप करण्यात आले आहेत.

सतीश सावंतांचा रोख भाजपाकडे

या बनावट वृत्ताची सतीश सावंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. भाजपकडून ही अफवा पसरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग ब्रेकिंग न्यूज या भाजपच्या खोट्या फेसबुक अकाउंट मार्फत सर्वत्र पसरविण्यात आलेली ही बातमी खोटी आहे. शिवसेने अंतर्गत गटबाजी निर्माण करण्यासाठी नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमार्फत सध्या ही केविलवाणी धडपड सुरू आहे. नितेश राणे यांनी आधी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे, आपले कार्यकर्ते सांभाळावे. अशी खोटी व कपटी कामे करूनच स्वाभिमान गुंडाळावा लागला आहे याची नोंद घ्यावी. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर व शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ८ संचालक विराजमान झाले. ४ संचालक फक्त एकूण ७ मतांनी पराभूत झाले आहेत. याचा आधी विचार करावा. केंद्रातील नेत्याला शेवटपर्यंत बसून रहावे लागले होते. विजय निश्चित नव्हता म्हणून जिल्ह्यातून घरी जावे लागले होते. याचा आधी विचार करावा. याची मी रीतसर पुराव्यानिशी पोलीसात तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती सतीश सावंत यांच्या मार्फ़त देण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!