पर्ससीन मच्छीमारांच्या साखळी उपोषणाला वाढता पाठींबा !
मच्छिमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता : मेजर श्रीपाद गिरसागर
शासनाने नवे परवाने देऊन सहकारातून पर्ससीन मासेमारी बळ द्यावे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन मच्छीमारांची भूमिका : साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन, मिनी पर्ससीन मच्छिमारांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मेजर श्रीपाद गिरसागर यांनी या साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी उपोषणस्थळी भेट दिली. मच्छिमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मच्छीमाराना आर्थिक प्रगतीपथावर नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नव्या दृष्टीने नवीन संकल्प करावा. पर्ससीन धारकांना नवीन परवाने देण्यात यावे. दिलेल्या परवान्यांचे नूतनीकरण व्हावे. एनसीडीसीच्या माध्यमातून पर्ससीन नेट धारक ट्रॉलर उभारणीसाठी शासनाने मच्छीमाराना कर्ज व अनुदान द्यावे, अशी मागणी पर्ससीन मच्छीमारांच्या वतीने कृष्णनाथ तांडेल यांनी केली आहे.
आमची लढाई आम्हा पर्ससीनधारक मच्छिमार यांच्या न्याय हक्कांसाठी आहे. तसेच परराज्यातील हायस्पीड व अन्य मासेमारी बोटी जे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसून मासळीची लूट करतात. वादळ परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विजयदुर्ग बंदरात मोठ्या संख्येने परराज्यातील मासेमारी बोटी आश्रय घेतात. यावरून परराज्यातील किती मासेमारी बोटी महाराष्ट्र, सिंधुदुर्ग हद्दीत मासेमारीस येतात हे स्पष्ट होते. त्यामुळे या परराज्यातील मासेमारी बोटीं विरोधी भूमिकाही पर्ससीन मच्छिमारांनी यावेळी स्पष्ट केली.
सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने नवीन सुधारित मच्छीमार कायद्यातील जाचक अटीं विरोधात मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग समोर सिंधुदुर्गातील पर्ससीन धारक मच्छीमारांनी १ जानेवारी पासून साखळी उपोषण छेडले आहे. रविवारी उपोषणकर्ते मच्छिमार यांनी शासनाकडे आणखी एक मागणी केली आहे. सहकारातून समृद्धीकडे या तत्वातून पर्ससीन मासेमारीस चालना मिळाली अशी भूमिका कृष्णानाथ तांडेल व सहकारी यांनी रविवारी मांडली. यावेळी सहदेव बापर्डेकर, सतीश आचरेकर, गोपीनाथ तांडेल, अशोक सारंग, संतोष शेलटकर, रेहान शेख, मुजफ्फर मुजावर यासह वेंगुर्ला, देवगड, मालवण येथील पर्ससीन धारक मच्छिमार उपस्थित होते.
पर्ससीनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजतोय ‘सहकार’ : कृष्णनाथ तांडेल
सहकार तत्वावर एकत्र येत मालवण तालुक्यातील सर्जेकोट-मिर्याबांदा येथे दोन गटांनी पर्ससीन मासेमारी व्यवसाय सुरू केला आहे. एका गटात १८ असे दोन गटात ३६ जण एकत्र येऊन सर्वसामान्य कुटुंबातील मच्छिमारांनी किमान भांडवल गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला आहे. पर्ससीन मासेमारी ही कमीत कमी प्रदूषकारी व फायदेशीर मासेमारी आहे. हे पटल्याने आणखीही समूह या मासेमारी व्यवसायात उतरत आहेत. एनसीडीसी पद्धतीने कर्ज व अनुदानही शासनाने या मच्छीमाराना द्यावे, अशी भूमिकाही कृष्णानाथ तांडेल यांनी मांडली आहे.
पर्ससीन जाळे विज्ञाननिष्ठ असुन कमीतकमी प्रदूषणकारी आहे. तसेच मच्छीमारांसाठी फायदेशीर असल्याने मासेमारीत उर्जितावस्था येणार आहे. याचा विचार केंद्र शासन व राज्य शासनाने करावा. ज्या प्रमाणे १९७८ सालापासून एनसीडीसीने यांत्रिक ट्रॉलर दिले, त्याप्रमाणे आता पर्ससीन नेट धारक ट्रॉलरची उभारणी करावी. एनसीडीसीने यासाठी पॅटर्न निर्माण करावा. ४० टक्के लाभार्थी भांडवल कर्ज रक्कम व ६० टक्के रक्कम सबसिडी रुपात द्यावी. पर्ससीन मासेमारीतून मिळणाऱ्या रोजगाराचा विचार करून पर्ससीन मासेमारीचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अर्थसहाय्य देऊन खंबीर पाठिंबा द्यावा. पर्ससीन मासेमारीवर असलेले निर्बंध राज्य शासनाने शिथिल करावे. अशी भूमिकाही कृष्णानाथ तांडेल यांनी मांडली.
मासेमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता : डॉ. श्रीपाद गिरसागर
साखळी उपोषणकर्ते पर्ससीन मच्छिमार यांची रविवारी सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, मेजर डॉ. श्रीपाद गिरसागर यांनी भेट घेतली. मासेमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार व उत्पन्न देण्याची क्षमता आहे. मासेमारी विकसित झाली पाहिजे, यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करावा. अशी भूमिकाही डॉ. गिरसागर यांनी स्पष्ट केली. १९८३ साली फिशिंग इंडस्ट्री मालवण या विषयावर आपण एमफिल केले असल्याचेही डॉ. गिरसागर यांनी यावेळी सांगितले.