यह तो सिर्फ झाकी है… नगरपालिका अभी बाकी है !
सिंधुदुर्ग बँकेतील विजयानंतर मालवणात भाजपचा जल्लोष
कुणाल मांजरेकर
मालवण : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने निर्विवाद विजय मिळविल्यानंतर मालवण शहरात भाजपाने एकच विजयी जल्लोष साजरा केला. “यह तो सिर्फ झाकी है… नगरपालिका अभी बाकी है” अशी घोषणाबाजी करतानाच आगामी मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीतही निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपने १९ पैकी ११ जागांवर विजय मिळवीत महाविकास आघाडीचा पराभव करत बँकेवर आपली सत्ता मिळविल्याने मालवणात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी भरड नाका येथे फटाके वाजवून आणि विजयी घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. जोरदार विजयी घोषणा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी आसमंत दणाणून सोडला. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, राणेसाहेब अंगार है, बाकी सब भंगार है”, ” नितेश राणेंचा विजय असो”, “निलेश राणेंचा विजय असो” अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, जगदीश गावकर, विजय केनवडेकर, आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर, भाऊ सामंत, पंकज पेडणेकर, उत्तम पेडणेकर, विनायक मोरजकर, भाजप युवमोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, दुर्गेश गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.