सिंधुदुर्ग पोलीस दलातील “त्या” रणरागिणीचा सोशल मीडियावर “बोलबाला”

ना. सतेज पाटील, रुपाली ठोंबरे- पाटील यांच्यासह दिग्गजांकडून कौतुक

कुणाल मांजरेकर

कोणत्याही क्षेत्रात आज महिला मागे नाहीत, हे दाखवून दिलंय सिंधुदुर्ग पोलीस दलातील तृप्ती मुळीक या महिला पोलीस भगिनीने ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या गाडीचं सारथ्य करण्याची घटना घडली. राज्यात मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य एका महिलेनं केल्याची ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे ह्या वृत्ताला राज्यभरात प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर देखील ह्याच घटनेचा बोलबाला झाल्याचं पाहायला मिळालं. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे- पाटील यांच्यासह दिग्गजांनी सोशल मीडियावर सिंधुदुर्ग पोलीस दलातील या रणरागिणीचं कौतुक केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. त्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केले. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा लोकनेते शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून आले. या घटनेला सर्वच माध्यमांकडून प्रसिद्धी मिळाल्याने संपूर्ण राज्यात या महिला चालकाचा बोलबाला झाल्याचे दिसून आले.

कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. गेल्या १० वर्षांपासून त्या महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत. २३ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे मंत्री सतेज पाटील यांच्या मनात पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून मुळीक यांचा फोटो शेअर केला आहे. कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मा. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी बसलेल्या गाडीचे सारथ्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनीही ट्विटर वरून मुळीक यांच्या बरोबरच अजित पवारांचे कौतुक केले आहे. लडकी हू लढना जानती हु ! सिंधुदुर्ग दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी केले. आदरणीय पवार साहेबांनी महिलाना नेहमी संधी दिली, अजितदादानी आज महिला भगिनीवर पुन्हा विश्वास दाखवुन तोच वारसा यशस्वी चालवत असल्याचं सिद्ध केलं असं त्यांनी म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!