भाजपा तालुकाध्यक्षांनी गड राखला ; चिंदर सोसायटी निवडणूकीत शिवसेनेचा धुव्वा !
शिवसेनेच्या ताब्यातील चिंदर रामेश्वर विकास सोसायटी भाजपकडे ; १३ पैकी १० जागांवर भाजप विजयी
कुणाल मांजरेकर
मालवण : भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी आपला गड राखला आहे. शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंदर येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या निवडणूकीत भाजपने १३ पैकी १० जागा ताब्यात घेत ही सोसायटी खेचून आणली आहे. भाजपा तालुकाध्यक्षांच्या गावातील या सोसायटीवर पुन्हा एकदा कब्जा मिळवण्यासाठी शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रित केले होते. मात्र भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक एकतर्फी जिंकली आहे.
चिंदर येथील रामेश्वर सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात होती. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या गावातील ही निवडणूक असल्याने शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र भाजप पुरस्कृत पॅनेलने येथील १३ पैकी १० जागांवर विजय मिळवून ही सोसायटी शिवसेनेकडून खेचून आणली आहे.
या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनल मधून देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, विश्वास खरात, सुनिल पवार, सुरेश साटम, बाळा लब्दे, परेश चव्हाण, आबा पारकर, आनंद पवार, राजश्री पाताडे यांनी विजय मिळवला. तर शिवसेना पुरस्कृत पॅनल मधून संजय माळकर, श्रीमती जावकर आणि सतीश हडकर हे विजयी झाले आहेत.
भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या व सभासदांच्या पाठींब्यावर हा विजय मिळाला आहे. संतोष कोदे, संतोष गावकर, सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे व सहकाऱ्यांच्या सहकार्याने मिळालेला हा सांघिक विजय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.