मत्स्यव्यवसायची कारवाई योग्यच ; आणखी एका गस्तीनौकेची गरज
आ. वैभव नाईक यांच्या मार्फत अधिवेशनात मागणी करणार : बाबी जोगी यांची माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : मत्स्यव्यवसाय खात्यामार्फत सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या कारवाईला पर्ससीन धारक मच्छिमार आक्षेप घेत असले तरी कायद्याच्या दृष्टीने सदरील कार्यवाही अतिशय योग्य स्वरूपात सुरू आहे. मात्र सागरी गस्तीसाठी एकच गस्ती नौका उपलब्ध असल्याने या कारवाईमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत विधानसभेच्या चालू अधिवेशनात सिंधुदुर्गसाठी आणखी एक गस्ती नौका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख तथा पारंपारिक मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गातील पर्ससीन धारक मच्छिमारांनी शुक्रवारी मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. यावेळी मत्स्य व्यवसाय विभाग एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप करून पर्ससीन धारकांना जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर बाबी जोगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मत्स्यव्यवसायच्या कारवाईचे समर्थन केले आहे. पर्ससीन धारक बेकायदेशीर मासेमारी करत असतील तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होणारच असे सांगुन सध्या सागरी गस्तीसाठी एकच गस्ती नौका उपलब्ध असल्याने अनेक वेळा कारवाईमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. सागरी गस्ती नौका वेंगुर्ल्याच्या समुद्रात असेल तर देवगडच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी होते. तर देवगडच्या दिशेने गस्तीनौका असेल तर वेंगुर्ल्याच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी आणखी एक गस्ती नौका उपलब्ध झाल्यास संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष राहणार आहे. आमदार वैभव नाईक सातत्याने पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्फत विधानसभेच्या चालू अधिवेशनात आणखी एका गस्तीनौकेची मागणी करणार असल्याचे बाबी जोगी म्हणाले.