मालवण पत्रकार समितीचे विविध पुरस्कार जाहीर ; ५ जानेवारीला वितरण सोहळा

महेश सरनाईक, संदीप बोडवे आणि सिद्धेश आचरेकर यांना पुरस्कार

तहसीलदार अजय पाटणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचाही होणार विशेष सन्मान

मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०२०-२१ या कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ५ जानेवारीला सकाळी १० वाजता धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.

कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार महेश सरनाईक, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार संदीप बोडवे तर पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार सिद्धेश आचरेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

मालवण तालुका पत्रकार समितीची सभा शनिवारी धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे समिती अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिव परेश सावंत, मनोज चव्हाण, अमित खोत, कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, उदय बापर्डेकर, नितीन आचरेकर, अनिल तोंडवळकर, सुधीर पडेलकर, संदीप बोडवे, आप्पा मालंडकर, संग्राम कासले, विशाल वाईरकर, केशव भोगले, नितीन गावडे यांच्यासह तालुक्यातील समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पत्रकार समितीच्यावतीने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. तसेच अन्य विषयांवर चर्चा झाली.

दरवर्षी ६ जानेवारीला होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार पुरस्कारांचा वितरण सोहळा पत्रकार दिन पूर्वसंध्येला आयोजित केला जातो. त्यानुसार हा सोहळा ५ जानेवारीला निश्चित करण्यात आला आहे. संस्कार हॉल येथे सकाळी १० वाजता मान्यवर, निमंत्रित यासह पत्रकार सदस्य व कुटुंबीयांच्या उपस्थितीत पत्रकार पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

तहसीलदार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांचा विशेष सत्कार

मालवण पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन पत्रकार पुरस्कारांसह प्रशासकीय सेवेत सर्वोत्कृष्ट व लोकाभिमुख सेवा बजावत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तहसीलदार अजय पाटणे, उपमुख्यकार्यकरी अधिकारी राजेंद्र पराडकर या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार या सोहळ्याच्या निमित्ताने केला जाणार आहे.

कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट सेवा बजावणारे राजेश पारधी, मालवण पंचायत समितीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त अमित खोत आणि पोईप सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या संतोष हिवाळेकर या पत्रकारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!