३१४ महिला घरेलू कामगारांना ४.७१ लाखांची लॉकडाऊन आर्थिक मदत मिळणार
२०११ ते २०१४ पर्यंतच्या महिलांनाही मिळणार मदत ; प्रत्येकी १५०० रुपयांची मदत
मजदूर संघाच्या पाठपुराव्याला यश ; हरी चव्हाण यांची माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन २०११ ते २०१४ अखेर पर्यंत नोंदीत असलेल्या घरेलू महीला कामगारांना लाॅकडाऊन आर्थिक मदत मागणीसाठी भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला यश आले आहे. ज्या घरेलू महीला कामगारांनी कामगार अधिकारी कार्यालयात आपल्या नोंदणीचे ऑनलाईन अपडेट केलेले आहे, अश्या ३१४ घरेलू महीला कामगारांना प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे प्रलंबित लाॅकडावून आर्थिक मदत मिळणार असून या अंतर्गत ४ लाख ७१ हजार जमा होणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
एप्रिल २०२१ च्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याणकारी मंडळाजवळ नोंदीत असलेल्या घरेलु कामगारांना आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली होती. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने प्रथम सन २०१५ ते २०२१ पर्यंत नोंदीत असलेल्या घरेलु कामगारांना १५००/- रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६९२ घरेलु महीला कामगारांना १० लाख ३८ हजार एवढी रक्कम कामगारांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. भारतीय मजदूर संघाने याविरोधात आवाज उठवून सन २०११ पासूनच्या सर्व नोंदीत घरेलु कामगारांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी लावून धरली. यासाठी मोर्चा, निदर्शने करण्यात आली. अखेर भारतीय मजदूर संघाच्या लढ्याला यश आले असून सन २०११ ते २०१४ अखेर पर्यंत नोंदीत असलेल्या व आपल्या नोंदणीचे ऑनलाईन अपडेट केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महीला घरेलु कामगारांना प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे ३१४ घरेलु कामगारांना ४ लाख ७१ हजार मिळणार असल्याचे हरी चव्हाण यांनी सांगुन ज्या घरेलु कामगारांची नोंदणी होऊन ओळखपत्र मिळालेले आहे, पण आर्थिक मदत त्यांचे बॅंक खात्यात जमा होणार नाही अशा कामगारांनी भारतीय मजदूर संघाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.