भाजपा तालुकाध्यक्षांना धक्का ; प्रतिष्ठेच्या वायंगणी सोसायटी निवडणूकीत पक्षाच्या पॅनेलला “भोपळा” !
१३ ही जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी ; उदय दुखंडे किंगमेकर
कुणाल मांजरेकर
मालवण : वायंगणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलने १३ पैकी १३ ही जागांवर निर्विवाद विजय मिळवल्याने भाजपला याठिकाणी भोपळाही फोडता आलेला नाही. भाजपा तालुकाध्यक्षांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते. या विजयामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी पं. स. सदस्य तथा सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष उदय दुखंडे शिवसेनेच्या या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
या निवडणुकीत दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये वैभव एकनाथ जोशी आणि संतोष बाळा कदम हे निवडून आले. तर ११ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातून सदानंद यशवंत राणे, अनिल हरिश्चंद्र बांदेकर, दशरथ धोंडी पाटील, अनिल श्रीधर महाजन, भगवान बाळकृष्ण सुर्वे, उदय राजाराम दुखंडे, दिलीप माणिक पुजारे, वासुदेव श्रीनिवास पाटील यांनी विजय मिळवला आहे. तर महिला प्रतिनिधी गटातून अर्चना अर्जुन आंबेकर आणि स्मिता गोविंद सावंत यांनी विजय मिळवला. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून हर्षद दिलीप पाटील यांनी विजय मिळवला.