देवबाग पोटनिवडणूकीतील विजय भाजपच्या आगामी विजयाची नांदी !
तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया ; विजयाचे श्रेय स्थानिक कार्यकर्त्यांना
निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली कुडाळ, मालवण तालुक्यातील प्रत्येक निवडणूका भाजपचाच विजय
कुणाल मांजरेकर
मालवण : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कालावधीत झालेला विकास आणि विद्यमान आमदारांच्या कालावधीतील भोंगळ कारभार यातील फरक आता सर्वसामान्य जनतेला कळून चुकला आहे. त्यामुळे राणेसाहेबांवर वाढत असलेला विश्वास आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे देवबाग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे. हा विजय भाजपाच्या आगामी विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे. माजी खासदार नीलेश राणे येथील प्रत्येक निवडणुकीत जातीनिशी लक्ष घालत आहेत. त्यामुळे आगामी काळात कुडाळ आणि मालवण तालुक्यातील प्रत्येक निवडणुकात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देवबाग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर धोंडू चिंदरकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
देवबाग मध्ये विजयाचे श्रेय स्थानिक कार्यकर्त्यांना आहे. राणेसाहेबांच्या कालावधीत झालेली विकास कामे आणि विद्यमान आमदारांच्या कालावधीत सुरू असलेला भोंगळ कारभार यामधील तफावत आता जनतेला समजली आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भाजपला यश मिळत आहे. देवबागमध्ये यापूर्वी आपले एकच ग्रामपंचायत सदस्य होते. त्यामुळे आम्ही बॅकफूटवर गेलो होतो. मात्र आता ग्रामीण भागातील कार्यकर्ते, जिल्हा स्तरावरील नेते एकसंघ पणे काम करीत आहेत. त्यामुळे देवबाग मधून विजयाची सुरुवात झाली आहे. आगामी काळात सोसायट्या, जिल्हा बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपा विजयी होईल. माजी खासदार निलेश राणे येथील प्रत्येक निवडणूकीत वैयक्तिकरित्या लक्ष देत आहेत. त्यामुळे निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ आणि मालवण तालुक्यातील आगामी सर्व निवडणूकांमध्ये विजय मिळवला जाईल, राणेसाहेबांवर वाढत असलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे आगामी काळात सर्व निवडणूका आम्ही जिंकू, असे ते म्हणाले.