मी शिवसेनेशी बांधिल, सुनील घाडीगांवकरच नव्हे तर कोणत्याही गटातटाशी संबंध नाही !
पं. स. सदस्य कमलाकर गावडे यांची प्रतिक्रिया ; कालच्या सभेला वैयक्तिक कामामुळे अनुपस्थित
कुणाल मांजरेकर
मालवण : पंचायत समिती मधील आम्ही आठ सदस्य बुधवारच्या बैठकीला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिल्याचे सांगणाऱ्या गटनेते सुनील घाडीगांवकर यांच्यावर पं. स. सदस्य कमलाकर गावडे यांनी पलटवार केला आहे. मी शिवसेनेशी बांधिल असून माझ्या वैयक्तिक कामामुळे कालच्या पं. स. सभेला अनुपस्थित राहिलो, त्यामुळे स्वतःच्या गटातटाच्या राजकारणात मला ओढू नका, पंचायत समिती प्रशासनाच्या कारभारावर मी समाधानी आहे. सुनील घाडीगांवकरच नव्हे तर कोणत्याही गटातटाशी माझा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया श्री. गावडे यांनी दिली आहे.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी घेण्यात आली. या सभेला तब्बल आठ सदस्य अनुपस्थित असल्याने केवळ चार सदस्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यानंतर गटनेते सुनिल घाडीगांवकर यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही आठ जण जाणीवपूर्वक सभेला अनुपस्थित राहिल्याचे सांगून सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आम्ही कंटाळलो आहोत. यापुढे आम्ही पक्षभेद विसरून स्वतंत्रपणे भूमिका मांडू, असे त्यांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी पं. स. सदस्य कमलाकर गावडे यांनी सभापती दालनात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही गटातटाच्या राजकारणाशी माझा संबंध नाही. मी वैयक्तिक कारणास्तव कालच्या बैठकीला अनुपस्थित राहिलो. त्याबाबत मी सभापतींना आगाऊ माहिती दिली होती. सुनील घाडीगांवकर यांनी आमचं नेतृत्व करू नये. मी शिवसेनेशी बांधिल असून पक्ष जो आदेश देईल, त्याप्रमाणे मी भूमिका ठरवणार आहे. पंचायत समितीच्या प्रशासनाबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. पंचायत समिती सभा असो अथवा कार्यक्रम, प्रत्येक वेळी प्रशासनाकडून मला निमंत्रण दिले गेले आहे. मी विरोधी बाकावरील सदस्य असून सभापती, उपसभापती जर मनमानी करीत असतील तर त्याला आळा घालण्यासाठी मी सक्षम आहे, त्यासाठी मला सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाची गरज नाही, असे कमलाकर गावडे यांनी म्हटले आहे.