मालवण आगारातील ३ कर्मचारी कामावर ; पहिली बस ओरोसला रवाना
तब्बल ३४ दिवसानी आगारातून सुटली बस ; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचे आगारप्रमुखांचे आवाहन
मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपातून मालवण आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे तब्बल ३४ दिवसानंतर मालवण आगारातून सोमवारी सकाळी ९.४५ वाजता मालवण कट्टा ओरोस ही बस फेरी सोडण्यात आली. अन्य कर्मचाऱ्यांनी देखील कामावर हजर व्हावे, असे आवाहन आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी केले आहे.
दुपारी १ वाजता मालवण कसाल, ओरोस तर उद्यापासून सकाळी ९.०५ वाजता ओरोस बस सुटणार आहे, अशी माहितीही श्री. बोवलेकर यांनी दिली. यावेळी उदय खरात, अमोल कामते, प्रसाद बांदेकर, ए. जी. वाघमारे, जी. वाय. गोळवणकर, एसटी चालक ए. जे. भोगवेकर, वाहक एम. एन. आंबेसकर आदि उपस्थित होते. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार मालवण आगारात वाहक, चालक व मॅकेनिक असे तीन कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.