आनंदव्हाळ येथे एसटी बसवर दगडफेक

दोघा रेनकोटधारींचे कृत्य ; बस ओरोसला मार्गस्थ

कुणाल मांजरेकर

मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात मागील दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातही मागील ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली असून सोमवारी मालवण आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने मालवण ओरोस मार्गावर पहिली एसटी बस धावली. दरम्यान, मंगळवारी ९.०५ वाजता मालवण आगारातून निघालेल्या मालवण ओरोस एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथे घडली आहे. दोघा रेनकोटधारी व्यक्तींकडून हे कृत्य झाले असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या राज्यशासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातील एसटी कर्मचाऱ्यांनीही या संपात सहभाग घेतल्याने जिल्ह्यात एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना हा संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनानुसार मालवण आगारात वाहक, चालक व मॅकेनिक असे तीन कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे तब्बल ३४ दिवसानंतर मालवण आगारातून सोमवारी सकाळी ९.४५ वाजता मालवण ओरोस ही बस फेरी सोडण्यात आली. मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता मालवण आगारातून सुटलेल्या मालवण ओरोस एसटी बसवर अज्ञात दोघा रेनकोटधारी व्यक्तींनी दगडफेक केली. एसटी बसच्या समोरील काचेवर एक दगड मारण्यात आला तर ड्रायव्हर साईडने देखील एक दगड फेकण्यात आला. यावेळी बसमध्ये १० प्रवासी होते. या दगडफेकीनंतर या अज्ञात व्यक्ती येथून पळून गेल्या. याबाबतची माहिती चालक वाहकाने मालवण आगारात दिल्यानंतर आगार प्रमुख सचेतन बोवलेकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. या बसमध्ये ओरोसला कामानिमित्त जाणारे शासकीय कर्मचारी होते. त्यामुळे बस मार्गस्थ करण्यात आली असून सायंकाळी बस डेपोमध्ये आल्या नंतर अज्ञातांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!