कोकण रेल्वेचे खासगीकरण नको ; खा. विनायक राऊतांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
कुणाल मांजरेकर
रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी कोकण रेल्वेच्या संभाव्य खासगीकरणाला त्यांनी विरोध दर्शवित हे खासगीकरण करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भारत सरकारने भविष्यात कोकण रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे असे काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. कोकण रेल्वे कार्पोरेशन द्वारे संचालित कोकण रेल्वे ही किनारपट्टी भागातील कोकणी जनतेची जीवनवाहिनी आहे. तसेच कोकणातील सामान्य लोकांसाठी हे स्वस्त आणि सर्वात पसंतीचे परिवहन साधन आहे. मात्र, कोकण रेल्वेच्या प्रस्तावित खासगीकरणानंतर आपला प्रवास आणखी महाग होईल, अशी भीती कोकणातील लोकांमध्ये आहे. आपल्यासह कोकण विभागातील इतर लोकप्रतिनिधींचा देखील कोकण रेल्वेच्या खाजगीकरणाला विरोध आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे प्रस्तावित खाजगीकरण लोकप्रतिनिधी आणि कोकणातील सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन करू नये, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.