कोल्हापूर मधील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
चंद्रकांत जाधव हे २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळा निवडून आलेले आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळांशी फुटबॉलच्या माध्यमातून त्यांचा थेट संपर्क होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कामान त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता. यशस्वी उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांची महाराष्ट्रभर ओळख होती. २०१९ मध्ये ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. शांत, मितभाषी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाले. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार असल्याची माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.