सिंधुदुर्गच्या पर्यटन राजधानीची “खड्डेमुक्ती” कडे वाटचाल !
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या वायरी- तारकर्ली- देवबाग रस्त्याची “खड्डेमुक्ती” कडे वाटचाल सुरू झाली आहे. खड्डेमय बनलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरवात झाली आहे. हे काम दर्जेदार पद्धतीने व्हावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह, वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी केले आहे.
वायरी, तारकर्ली, देवबाग या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या रस्ता दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र कोरोना महामारीमुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले होते. या कामास उशिराने सुरवात झाल्याबद्दल श्री. खोबरेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र आता या कामास सुरुवात झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी त्या त्या भागातील ग्रामस्थांनी, वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री. खोबरेकर यांनी केले आहे.