… मग प्रभागातील विकास कामांसाठी पत्र केंद्र सरकारला दिले होते का ? निधीही केंद्राकडून आणला की काय ?
शिवसेना तालुका समनव्यक पूनम चव्हाण यांचा नगरसेविका पूजा करलकर यांना खोचक सवाल
कुणाल मांजरेकर
मालवण : सत्ता कोणाचीही असो, नगराध्यक्ष कोणत्याही पक्षाचा बसू देत, आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ७ मध्ये सव्वा दोन कोटींची विकास कामे झाल्याचे सांगणाऱ्या नगरसेविका पूजा करलकर यांच्यावर शिवसेनेच्या तालुका समन्वयक पूनम चव्हाण यांनी टीका केली आहे. प्रभागातील विकास कामांच्या मंजूरीसाठी प्रस्ताव नगराध्यक्ष किवा प्रशासन यांनी केला नसेल तर मग आपण पत्र केंद्र शासनाला दिले होते का ? आणि त्या कामांसाठी निधी केंद्र शासनाचा आणला काय ? याचे उत्तर करलकर यांनी द्यावे, असे आव्हान सौ. चव्हाण यांनी दिले आहे.
काम असेल तेव्हा नगराध्यक्ष आणि आमदार यांना फोन लावायचे आणि काम झालं की ते आपल्या पाठपुराव्यामुळे ? फक्त एक पत्र दिलं म्हणजे पाठपुरावा होत नाही. सत्ता शिवसेनेची, नगराध्यक्ष शिवसेनेचे, पालकमंत्री, खासदार, आमदार शिवसेनेचे, मग आपण पाठपुरावा कोणाकडे केला ? नगराध्यक्ष यांनी मालवणच्या विकास कामात कधीही दुजाभाव केला नाही की विरोधक यांनी सूचवलेली कामे नाकारली नाहीत, असे पूनम चव्हाण यांनी म्हटले आहे.
निदान स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकाला तरी श्रेय द्या
आपल्या प्रभागातील दोन्ही नगरसेवक भाजपाचे असताना गेल्या पाच वर्षात २ कोटीचे प्रस्ताव नगराध्यक्ष यानी मंजूर करून आणले हे त्याचे जीवंत उदाहरण आहे. आपल्या प्रभागातील आपल्याच पक्षाचे आप्पा लुडबे विकास कामांच्या मंजूरीबाबत प्रशासनाचे जाहीर आभार मानत आहेत. आणि आपण नगराध्यक्ष, आमदार, खासदार, पालकमंत्री यांचे आभार मानायचे सोडून आपल्या एकट्याच्या प्रयत्नातून प्रभागातील काम झाल्याचे सांगून आपल्याच पक्षाचे आपल्या प्रभागातील नगरसेवक आप्पा लुडबे यानी काहीच काम केले नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे की काय? निदान आपल्या बरोबर आपल्या पक्षाच्या नगरसेवकाला तरी कामाचे श्रेय द्यायला पाहिजे होते.
या प्रभागातील जनतेलाही माहिती आहे की सत्ताधारी पक्षाने आपली कामे मंजूर केली आहेत. महाराजा हॉटेल रस्ता , त्याचप्रमाणे एसटी स्टँड मागे जाणाऱ्या रस्त्यासाठी तिकडच्या स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकड़े पाठपुरावा केला आहे. गणेश कोंड येथील सुशोभीकरणा बाबत तेथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष यांच्या कड़े मागणी केली होती. सोयीप्रमाणे राजकारण करायचे सोडून दया. ज्याचे श्रेय त्याला द्यायला शिका. संबंधितांचे आभार मानता येत नसतील तर निदान सत्ताधारी, नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांच्या शिवाय निधी मंजूर करुन आणल्याचे सांगून स्वतःचे अज्ञान तरी प्रकट करु नका, असेही पूनम चव्हाण यांनी म्हटले आहे.