राजकिय अस्तित्व संपुष्टात आलेल्या बाबी जोगीनी शिवसेनेतील स्वतःचे स्थान पडताळून पहावे

लीलाधर पराडकर, दादा वाघ यांची टीका : सुदेश आचरेकर हे स्व कर्तृत्वावर अपक्ष निवडून येणारे स्वयंप्रकाशित नेते

बाबी जोगी आमच्या खिसगणतीतही नाहीत, ते तर बहुचर्चित गॉगल गॅंगचे सदस्य असल्याचीही बोचरी टीका

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा माजी नगरसेवक लीलाधर पराडकर आणि दादा वाघ यांनी समाचार घेतला आहे. सुदेश आचरेकर हे स्वतःच्या प्रभागात स्व कर्तृत्वावर अपक्ष म्हणून निवडून येणारे स्वयंप्रकाशित नेते आहेत. म्हणूनच पालकमंत्री उदय सामंत यांनी रॉकगार्डन मधील कार्यक्रमात एकदा दोनदा नव्हे तर पाच ते सहावेळा आचरेकर यांचे जाहीर कौतूक करून शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली होती. या उलट बाबी जोगी यांची राजकिय कारकीर्द संपुष्टात आली आहे. त्यामुळे स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी ते आचरेकर यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांनी आपल्या पक्षात स्वतःचे स्थान काय आहे, ते आधी पडताळून पहावे, नंतरच दुसऱ्यावर टीका करावी, असा सल्लाही पराडकर आणि वाघ यांनी दिला आहे. बाबी जोगी आमच्या खिसगणतीतही नाहीत, ते तर बहुचर्चित गॉगल गॅंगचे सदस्य असल्याची बोचरी टीकाही करण्यात आली आहे.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मालवण नगरपालिकेच्या कारभारावर काही प्रश्न उपस्थित करतानाच आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली होती. त्यावर शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी प्रत्त्युत्तर देताना आचरेकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा लीलाधर पराडकर आणि दादा वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकातून समाचार घेतला आहे. सत्य कधीही पचनी पडत नाही म्हणून एका शब्दाला पुढे करून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी करत आहेत. बाबी जोगी राष्ट्रवादीत असताना त्यांची आमने सामनेवेळी काय गत झाली होती, हे ते आता विसरलेत वाटते. मात्र तुमची त्यावेळची काय अवस्था झाली होती हे संपूर्ण मालवणला ज्ञात आहे. जोगी यांनी सुदेश आचरेकर यांच्या अस्तित्वाची काळजी करू नये ते स्वतः स्वयंप्रकाशित आहेत व ते स्वकर्तृत्वावर अपक्ष म्हणून प्रभागात निवडून येणारे मालवणमधील एकमेव नेतृत्व आहे. म्हणून त्यांच्याबद्दलचे बोलायचे सोडा तुमची त्यांच्यासमोर उभी राहण्याची योग्यता आहे काय ते आधी पडताळून पहा.

आचरेकर यांनी वस्तुस्थिती सांगितली म्हणून राग कशाला? आमदार वैभव नाईक हे कुडाळ मालवण या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी मालवण शहराचा वस्तुस्थितीचा परिस्थितीचा आढावा घ्यावा. आतापर्यंत केलेल्या भूमिपूजनांची काय अवस्था झाली आहे. मालवण नगर परिषदेत विकासाचे तीन तेरा वाजले आहेत. संपूर्ण शहर बकाल केले. ठिकठिकाणी भूमिपूजन केलेल्या इमारतींचे सांगाडे तयार झालेले आहेत. घनकचरा व्यवस्थापनाची दुर्दशा, घनकचरा व्यवस्थापनासाठी गेली पाच वर्षे ३ कोटी १० लाख रुपये न भुतो न भविष्यती असा विक्रमी खर्च करूनही स्वच्छता अभियानामध्ये मालवण नगर परिषदेची पिछेहाट तसेच मालवण शहरांमध्ये जेसीबी ट्रॅक्टर भाड्यामधील भ्रष्टाचार इत्यादी मुद्दे आमदारांच्या निदर्शनास आणणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आचेरकर आपले कर्तव्य समजतात. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना कर्तव्य समजत नसेल तर तो त्यांचा दोष आहे, असाही टोला त्यांनी मारला आहे.

आमदार वैभव नाईक हे नगर परिषदेमध्ये आल्यानंतर स्वत:हून आचरेकर ज्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी स्वतःहून भेटायला येतात. परंतु त्यांना कधीही वैयक्तिक काम अगर सामाजिक काम कधीही सांगितले नाही आणि त्यांची कधीही गरज लागली नाही. त्यासाठी आम्ही स्वतः समर्थ आहोत. आपल्या कामासाठी ते कधीही पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे गेले नाहीत. अगर कधीच कसलेच कामही सांगितले नाही व ते काम सांगण्याची आवश्यकता भासली नाही. त्यासाठी आचरेकर समर्थ आहेत. पालकमंत्री यांनी रॉकगार्डन येथील जाहीर सभेमध्ये आचरेकरांना आमच्या पक्षात सामील व्हा, असे सांगितले होते. आचरेकर हे मालवण शहरातील एक अभ्यासू व कणखर नेतृत्व असल्याचे पालकमंत्र्यांना ज्ञात असल्याने जाहीर सभेमध्ये एकदा नव्हे पाच ते सहा वेळा त्यांचे कौतुक केले. सुदेश आचरेकर यांच्या कामाची ती खरी पोचपावती आहे. तसेच खासदार विनायक राऊत यांनीही त्याला पुष्टी दिली होती. सुदेश आचरेकर यांनी २५ वर्षे मालवण नगरपरिषदेवर वर्चस्व ठेवले. या पंचवीस वर्षात पाच वेळा नगराध्यक्ष होण्याचा सन्मान मिळवला. हे सर्व मालवणच्या जनतेच्या प्रेमापोटी व नारायण राणे यांचा सच्चा व निष्ठावंत सैनिक म्हणून आजही अभेदय आहेत. म्हणून अपक्ष निवडून आल्यावरही अनेक पक्षांच्या ऑफर असताना कुठल्याही पक्षात न जाता राणे यांच्याबरोबर प्रामाणिक राहिले. हे केवळ राणे व राणे परिवाराच्या प्रेमापोटी, असे लीलाधर पराडकर आणि दादा वाघ यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!