सिंधुदुर्ग जिल्हा बँके निवडणूकीचे बिगुल वाजले !
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन सादर करण्याची मुदत : ३० डिसेंबरला मतदान
कुणाल मांजरेकर
मालवण : सर्वांची उत्कंठा लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासूनच म्हणजे २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल होणार असून ३० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, राज्य निवडणूक प्राधिकरण कार्यालय, सहकार आयुक्त यांच्या संकेतस्थळावर या निवडणुकीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
विद्यमान भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कॉंग्रेस मध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या बँकेवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचे प्राबल्य दिसून आले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कंबर कसली आहे. तर महाविकास आघाडीचीही या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या बँकेच्या निवडणूक प्रक्रिये विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे ही निवडणूक लांबली होती. मात्र उच्च न्यायालयाने या सर्व हरकती फेटाळल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.
अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उपविभागीय अधिकारी कुडाळ यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. तर ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी कुडाळ यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ, बँकेचे प्रधान कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, राज्य निवडणूक प्राधिकरण कार्यालय, राज्य निवडणूक प्राधिकरण / सहकार आयुक्त यांच्या संकेतस्थळावर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ७ ते २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी आणि चिन्हांचे वाटप होणार आहे. ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजता आठही तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असून ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी होणार आहे. या निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याचे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केले आहे.