भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र तळाशीलकर
उपाध्यक्षपदी यशवंत मिठबावकर यांची निवड
मालवण : मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र तळाशीलकर तर उपाध्यक्षपदी यशवंत मिठबावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच २५ वर्षे संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे. सन २०२१ ते २०२६ या काळासाठी ही निवड झाली आहे.
पतसंस्थेच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. अध्यक्षपदासाठी रवींद्र तळाशीलकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून सुरेश चव्हाण तर श्रीकांत वेंगुर्लेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी यशवंत मिठबावकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून भिकाजी दुधवडकर तर राजीव आचरेकर यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी रवींद्र तळाशीलकर तर उपाध्यक्षपदी यशवंत मिठबावकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. अन्य संचालक मंडळ पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण मतदार संघातून भिकाजी दुधवडकर, सुनील नाईक, सचिन आरोलकर, राजीव आचरेकर, हेमेंद्र गोवेकर, इतर मागासप्रवर्ग मतदार संघातून श्रीकांत वेंगुर्लेकर, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून सुरेश चव्हाण, राखीव मतदार संघातून रसिका तळाशीलकर, शुभदा करंगुटकर यांचा समावेश आहे.
तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पटसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली याचे पूर्ण श्रेय हे आमच्या सर्व सभासद बांधव आणि कर्मचारी वृंदाचे असून भविष्यात संस्थेचे आधुनिकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे आर्थिक व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न सर्व संचालकांच्या साथीने करणार असून प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये सभासदांना जास्तीत जास्त लाभांश देण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत, असे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी स्पष्ट केले. पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण मयेकर यांनी नूतन संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या.